‘स्वयंपूर्ण’ गोव्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिनी सेवा, सुशासन आणि जनकल्याण कार्यक्रम
पणजी, २४ एप्रिल (वार्ता.) – ‘स्वयंपूर्ण’ गावाची निर्मिती झाल्यासच ‘स्वयंपूर्ण’ गोवा निर्माण होणार आहे. गोमंतकियांनी ‘स्वयंपूर्ण’ गावाची निर्मिती करण्यासाठी गावातील ‘स्वयंपूर्ण मित्र’ यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २४ एप्रिल या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा, सुशासन आणि जनकल्याण कार्यक्रमाच्या अंतर्गत साळगाव पंचायतीला भेट दिली. या वेळी साळगाव पंचायतीत ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने राज्यातील पंचायती आणि पालिका यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना हे आवाहन केले. या वेळी स्थानिक आमदार केदार नाईक, साळगावचे सरपंच लुकास रेमेडिओस, प्रशासकीय अधिकारी आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसमवेत वेळ घालवला.
Glimpses of my interaction with people of Saligao Village as Swayampurna Mitra. pic.twitter.com/4mnbkrJlGH
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 24, 2023
ते पुढे म्हणाले,
‘‘स्वयंपूर्ण’ गाव म्हणजे शेती, बागकाम (हॉर्टिकल्चर), मत्स्यउद्योग आदींमध्येच ‘स्वयंपूर्ण’ होणे एवढेच नव्हे, तर त्याहून पुढे जाऊन गावात कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती, सौरऊर्जा निमिर्ती आदींसंबंधीही ‘स्वयंपूर्ण’ होणे आवश्यक आहे. सरकारची प्रत्येक योजना, सरकारचे ‘स्टार्ट अप’ धोरण, ‘सौरऊर्जा’ निर्मिती धोरण गावागावांत पोचले पाहिजे. ‘स्वयंपूर्ण मित्र’ वयोवृद्धांना मिळणार्या योजनांविषयी त्यांना मार्गदर्शन करत आहेत, तसेच पदव्युत्तर पदवी घेऊन घरी असलेल्यांना ‘माहिती तंत्रज्ञान’ योजना आदी सरकारी योजनांविषयी माहिती देत आहेत. सर्वांना समवेत घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या प्रयत्नांनी सर्वांचा विकास करणे (‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’) हे सरकारचे धोरण आहे. यामध्ये सर्वांनी प्रयत्न करण्याला पुष्कळ महत्त्व आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा -२’ चा केंद्रबिंदू कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची निर्मिती हा आहे. गोवा सरकारने गोमंतकियांना सरकारच्या विविध सेवा आणि योजना यांचा लाभ घेण्यासाठी ‘गोवा की बात’ या योजना यशस्वीपणे राबवणे चालू केले आहे. ‘स्वयंपूर्ण’ गोव्याच्या निर्मितीसाठी नागरिक आणि ‘स्वयंपूर्ण मित्र’ यांच्या सहकार्याने १० प्रमुख सूत्रांवर भर देऊन त्यांची यशस्वीपणे कार्यवाही करण्यात आली आहे.’’
As a Swayampurna Mitra, participated in #Seva, #Sushasan and #JanKalyan programme organised at Saligao Panchayat. Interacted with the people of Saligao to understand and address their issues. I thank the Village Panchayat of Saligao, the people, MLA Kedar Naik for their warmth… pic.twitter.com/YoWk0oJYPq
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 24, 2023
येत्या ३ मासांत ‘लाडली लक्ष्मी’चे अर्ज निकालात काढणार !
या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांची गार्हाणी ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. या वेळी एका विवाहितेने तिला गेली ५ वर्षे ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे अर्थसाहाय्य मिळाले नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘विवाहित ‘लाडली लक्ष्मी’ अर्जदारांचे प्रलंबित अर्ज ३१ मार्चपर्यंत निकालात काढण्याचे आदेश मी महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकार्यांना दिले होते; मात्र तरीही अर्ज प्रलंबित असेल, तर येत्या ३ मासांत या योजनेतील सर्व अर्ज निकालात काढले जाणार आहेत.’’
स्वत:च्या भूमीत असलेल्या अनधिकृत बांधकामाला अर्ज करूनही घर क्रमांक न मिळाल्याचे एका व्यक्तीने नजरेस आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कोणतीही बांधकामे घर क्रमांकाविना प्रलंबित ठेवली जाणार नसल्याचे म्हटले. स्वत:च्या मालकीच्या भूमीत घर बांधलेले असल्यास ते नियमित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. अन्य एका प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील दंतचिकित्सकांची उणीव भरून काढण्यासाठी लवकरच कंत्राटी पद्धतीवर नवीन दंतचिकित्सक भरती केले जाणार असल्याचे सांगितले. या वेळी अनेकांनी उपस्थित केलेले प्रश्न सोडवतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्य केंद्रात पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणार, साळगाव येथे फुटबॉल मैदान उभारणार आदी आश्वासने दिली.