सौ. सुफला सदाशिव परब (वय ७२ वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर गुरुकृपेने त्यांच्यात झालेले पालट !
सौ. सुफला सदाशिव परब (पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पत्नी) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर गुरुकृपेने आश्रमातील चैतन्यामुळे त्यांच्यात पालट झाले. त्यांना जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१. शारीरिक स्तरावर जाणवलेले पालट
अ. मी घरी असतांना माझ्याकडून कोणतीही गोष्ट करतांना ते काम म्हणून केले जात होते. आश्रमात आल्यावर मी प्रत्येक कृती करतांना ‘सेवा करते’, असा भाव ठेवल्याने त्यातून मला आनंद मिळू लागला.
आ. मी घरी असतांना माझ्या पायाला दुखापत झाल्याने मला चालता येत नव्हते. मला चालतांना काठीचा आधार घ्यावा लागत होता. मला आश्रमात येऊन १ मास पूर्ण होण्याच्या आधीच मी कसलाही आधार न घेता चालू शकले.
२. मानसिक स्तरावर जाणवलेले पालट
अ. मी घरी असतांना माझ्या मनात अनावश्यक विचार येण्याचे प्रमाण अधिक होते. मी आश्रमात रहायला आल्यावर माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून झाले.
आ. मी घरी असतांना मला निरुत्साही वाटायचे. आता आश्रमातील चैतन्यामुळे मला आनंद अनुभवता येतो.
इ. आश्रमातील साधक मला प्रेमाने समजून घेतात. त्यामुळे मला सगळ्यांविषयी आपलेपणा वाटतो. ‘आश्रमातील साधक हे गुरुदेवांच्या कृपेने लाभलेले कुटुंबीय आहेत’, असे आता मला वाटते.
ई. मला आता साधकांशी मनमोकळेपणाने बोलता येते.
उ. ‘घरी जाऊ नये. आश्रमातील चैतन्य अनुभवत रहावे’, असे आता मला वाटू लागले आहे.
३. आध्यात्मिक स्तरावर जाणवलेले पालट
अ. मी घरी असतांना मला होत असलेल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या त्रासांचे प्रमाण अधिक होते. मी नामजपादी उपाय करूनही ते त्रास न्यून होत नव्हते. मी आश्रमात आल्यावर मला होणार्या त्रासांचे प्रमाण गुरुकृपेने न्यून होऊन ‘गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याकडून नामजपादी उपाय करून घेत आहेत’, असे मला जाणवते.
आ. ‘गुरुदेवांची कृपा आणि आश्रमातील चैतन्य’ यांमुळे मला दिवसभर श्रीकृष्ण अन् गुरुदेव यांच्या अनुसंधानात रहाता येते. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होतात.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या असीम कृपेने मी हे अनुभवू शकले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– चरणसेविका, सौ. सुफला सदाशिव परब (वय ७२ वर्षे, पू. सदाशिव परब यांच्या पत्नी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.११.२०२२)