वाल्मीकि रामायण ही विज्ञान, अध्यात्म, व्यवस्थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी कथा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
पुणे येथे ‘वाल्मिकी रामायण’ ग्रंथांचा प्रकाशन सोहळा
पुणे – वाल्मीकि रामायण ही चमत्कारावर आधारित रामकथा नसून विज्ञान, अध्यात्म, व्यवस्थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी ही कथा आहे. प्रभु श्रीराम यांच्या नावाने दगड तरंगतात, यावर माझा पूर्ण विश्वास आहे; कारण देशात आजही अनेक मानवी दगड प्रभु श्रीराम यांचे नाव घेऊन तरंगत आहेत, असे वक्तव्य श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोशाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी राजकीय नेत्यांना उद्देशून केले आहे. पुण्यातील ‘वेदिक कॉसमॉस’ या प्रकाशन संस्थेच्या वतीने अनोख्या ग्रंथ स्वरूपात सिद्ध करण्यात आलेल्या ‘वाल्मीकि रामायणा’ ग्रंथांचे प्रकाशन प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, रामायणाचा अभ्यास करण्यासाठी वाल्मीकि रामायण हेच मूळ रामायण आहे. वाल्मीकि रामायणात सर्व मानवी मर्यादांचे पालन करतांनाही, कशा प्रकारे तुम्ही प्रेम, धर्म, कर्तव्य यांचे पालन करू शकता याचे योग्य उदाहरण दिले आहे. यामुळेच लोकांनी विशेषकरून तरुण पिढीने ‘वाल्मीकि रामायण’ अवश्य वाचले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.