सुदृढ मन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) !
आपण आज तंत्रज्ञानाच्या बळावर अनाकलनीय असे यश संपादन केले आहे. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील क्रांतीने मानवाचे भौतिक जीवन अंतर्बाह्य पालटून गेले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक चांगल्या गोष्टी माणसाने संपादन केल्या आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
त्यात आता कृत्रिम बुद्धीमत्तेची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) भर पडली आहे. या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या बळावर प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेली गोष्टसुद्धा आपल्याला सहजपणे खरी आहे, असे दाखवता येते. थोडक्यात काहीही घडलेले नसतांना पुष्कळ काही घडले आहे, असे छायाचित्राच्या किंवा चित्रीकरणाच्या माध्यमातून दाखवता येते. त्यामागे करमणुकीचा, मनोरंजनाचा दृष्टीकोन असेल, तर फारसा फरक पडत नाही; पण या सर्व गोष्टी मागे विकृत मनोवृत्ती असेल, तर मात्र मानवाचे सामाजिक, राजकीय आणि व्यक्तीगत किंवा कौटुंबिक जीवन पूर्णपणे मातीत मिसळून जाईल.
१. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या बळावरच विकृत छायाचित्रांची निर्मिती केल्याची उदाहरणे
१ अ. अमेरिका आणि रशिया यांच्या आताच्या राष्ट्राध्यक्षांची केलेली विकृत छायाचित्रे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन यांची काही छायाचित्रे नुकतीच सर्वत्र प्रसारित झाली आहे. या छायाचित्रांतून असे स्पष्ट दिसते की, जगातील या दोन मोठ्या राष्ट्रांचे शासनकर्ते स्वयंपाकघरात स्वयंपाक करतांना दिसतात. समुद्रकिनार्यावर लहान मुलांप्रमाणे बागडतांना दिसतात. या छायाचित्रांमुळे या दोन महान नेत्यांविषयी संशयाची पाल मनात चुकचुकू लागते. अशा प्रकारच्या विकृत छायाचित्रांची निर्मिती कृत्रिम बुद्धीमत्तेच्या बळावर निर्माण करण्यात आली आहेत.
१ आ. अमेरिका आणि जर्मनी यांच्या माजी राष्ट्राध्यक्षांची केलेली विकृत छायाचित्रे : बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि जर्मनीच्या नेत्या अँजेला मर्केल या दोघांची समुद्रात जलक्रीडा करत असलेली छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी परस्परांना आलिंगन दिल्याचीही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहेत. ही सर्व छायाचित्रे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या बळावरच सिद्ध करण्यात आलेली आहेत, म्हणजेच ही सारी बनावट (खोटी) छायाचित्रे आहेत.
२. सध्याच्या समाजात सज्जन आणि सुसंस्कृतपणा यांचा अभाव !
माणूस सुशिक्षित, सुविद्य आणि सुसंस्कृत असला पाहिजे. आपल्या कोणत्याही वर्तनाने कुणाचीही हानी होऊ नये, याची जो काळजी घेतो, तो ‘सुसंस्कृत’ म्हणून ओळखला जातो; पण दुर्दैवाने आज सभ्य समाजात रहाणार्या अनेकांमध्ये सज्जनता आणि सुसंस्कृतपणा राहिलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. विज्ञानाने अनेकविध शोध लावले. मानवाचे भौतिक जीवन दृष्ट लागेल एवढे सुखासीन केले आहे; पण माणसाची मानसिक विकृती मात्र दिवसेंदिवस वाढतांना आढळते, हीच चिंतेची गोष्ट आहे.
३. मनावर संस्कार करण्याचे महत्त्व !
जगातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांची बनावट छायाचित्रे अशी विकृतपणे समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात असतील, तर सर्वसामान्य जीवन जगणार्या लोकांची सुद्धा कृत्रिम बुद्धीमत्तेच्या बळावर चारित्र्यहनन करणारी छायाचित्रे प्रसारित केली जाणार नाहीत, याविषयी निश्चिती देता येत नाही. एखाद्याची हत्या करण्यासाठी आता शस्त्राची आवश्यकता नाही. एखाद्याची अशी बनावट अश्लील छायाचित्रे प्रसारित करून कुणालाही कळणार नाही, अशा प्रकारे सूड घेतला जाऊ शकतो.
माणसाने विज्ञानात प्रगती करत असतांना मानवी मनाचा विकास आणि मनाची सुदृढता यांकडे लक्ष दिले नाही. ही माणसाची सर्वांत मोठी चूक आहे. यासाठीच उत्तम संस्कार मनावर करणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते.
४. बनावट छायाचित्रांमुळे होणारा दुष्परिणाम !
सुविद्य माणूस सुसंस्कारित असतोच, असे नाही. याचा प्रत्यय आपल्याला आता वारंवार येऊ लागला आहे. श्रीमंत माणसाकडून पैसे उकळण्यासाठी या कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग केला जाणार नाही, असे आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. धनवानाच्या मुलाचे बनावट छायाचित्र सिद्ध करून त्या मुलाचे आपण अपहरण केले आहे, अशी बतावणी छायाचित्रासह त्या मुलाच्या पालकांपर्यंत पोचवता येईल. त्यासह दुसर्या कोणत्या तरी एका व्यक्तीचे काल्पनिक चित्र रेखाटून त्या माणसाने मुलाचे अपहरण केले आहे, हे बनावट छायाचित्राद्वारे दाखवले जाईल. योगायोगाने त्याच चेहर्याची व्यक्ती अस्तित्वात असेल, तर कोणताही अपराध केला नसतांना त्या व्यक्तीवर अपहरणाचा आरोप केला जाईल. ती व्यक्ती अकारण शिक्षेस पात्र ठरून शिक्षा भोगेल. अशा प्रकारे निरपराधी अपराधी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही काळासाठी तरी एखाद्याला कलंकित करण्याच्या हेतूने अशी बनावट छायाचित्रे प्रसारित केली जातील. लोकांना सत्य समजेपर्यंत संबंधित व्यक्ती ही अपकीर्ती सहन न झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने दगावू शकेल.
५. मानवाने अत्यंत सावधपणे जीवन जगणे आवश्यक !
कृत्रिम बुद्धीमत्ता हे एक दुधारी शस्त्र आहे. चांगल्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग केला, तर त्यात सर्वांचेच कल्याण आहे, अन्यथा विकृत मनोवृत्तीच्या माणसांमुळे किंवा सुदृढ मनाच्या अभावामुळे अकारण कुणाचाही जीव जाऊ शकतो. विज्ञानाने प्रगती केली, विकास केला; पण मानवाचा मनोविकास विज्ञानाला करता आला नाही. माणसाने स्वतःच्या मनाला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीत वैज्ञानिक वा तंत्रविज्ञानातील प्रगती माणसाचे जीवन उद़्ध्वस्त करू शकते; म्हणून माणसाने आता अत्यंत सावधपणे जगणे नितांत आवश्यक आहे. त्यासह चटकन कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणे, हेच हिताचे ठरेल.
पालकांनी मुलांच्या हातामध्ये आधुनिक उपकरणे देण्यापूर्वी त्या मुलांची मने सुदृढ आणि निकोप ठेवण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करणे नितांत आवश्यक आहे. आपण ही काळजी घेतली नाही, तर माणसाचे जीवन मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२८.३.२०२३)