चिनी आक्रमण आणि घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ अत्यावश्यक !
भारताने चीनच्या विरोधात आक्रमक परराष्ट्र धोरणाचा अवलंब करून त्याची नांगी ठेचायला हवी !
(टीप : व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम म्हणजे भारताच्या सीमेवरील गावांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने राबवलेली योजना)
काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अरुणाचल प्रदेश सीमेवर गेले आणि तिथे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’चे कार्य चालू झाले. ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ म्हणजे काय ? त्याचा उपयोग काय आहे ? येणारी आव्हाने काय असतील ? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
१. सीमा भागात निर्जन होत चाललेली गावे !
भारताची सीमा विविध ठिकाणी चीनच्या सीमेला मिळत असते, जसे की, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आदी सीमा भागात पूर्वी जितक्या प्रमाणात लोकसंख्या होती, ती कालांतराने अतिशय न्यून झाली. मूलभूत सुविधा, रहाण्याची सोय इत्यादी गोष्टींची कमतरता असल्याने तिथे रहाणारे लोक केवळ छोटे-मोठे व्यवसाय करत असत. देशात विकास वाढू लागल्याने सीमा भाग सोडून लोकांनी शहरी किंवा विकसनशील भागांकडे स्थलांतर करायला पसंत केले. सीमा भागात असलेली जवळपास सर्वच गावे निर्जन झाली.
२. चीनची घुसखोरी न्यून करण्यासाठी सीमा भागातील भारतियांची वाढती लोकवस्ती निश्चित साहाय्यक !
आज आपल्या सीमेवर सर्व ठिकाणी सैन्य नसते. याचे कारण असे की, प्रत्येक ठिकाणी सैन्य उभे करण्याचा व्यय (खर्च) अधिक असतो. केवळ अतीमहत्त्वाच्या ठिकाणी सैन्य उभे केले जाते. सीमाभागावर सैन्य नसेल, तर चीनकडून घुसखोरीचे प्रकार वाढतात. अनेक वेळा असेही झाले आहे की, भारतियांना अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनच्या लोकांनी पकडले आहे. सरकारने ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’च्या अंतर्गत असे ठरवले की, सीमा भागातील लोकसंख्या वाढली पाहिजे. ही लोकसंख्या वाढण्यासाठी तेथील रहाणीमान चांगले असायला हवे, तसेच पाणी, वीज, भ्रमणभाष संपर्क यंत्रणा इत्यादी उपलब्ध व्हायला हवे. हे झाल्यास सीमा भागातील भारतियांची लोकवस्ती वाढून चीनची घुसखोरी न्यून व्हायला निश्चितच साहाय्य होईल.
चीननेही २ वर्षांपूर्वी असाच ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ चालू केला होता. भारतीय अर्थसंकल्पात ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’साठी प्रावधान (तरतूद) करण्यात आले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सीमा भागात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित झाले. सध्या ईशान्य भागातील रस्ते पुष्कळ चांगले झाले आहेत. तिथे जायलाही आता पूर्वीपेक्षा सुलभता झाली आहे. त्यामुळे व्यापार, पर्यटन हे अल्पावधीत शक्य होत आहे. सरकारने सीमेवर ६५० हून अधिक गावांमध्ये ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’च्या अंतर्गत कार्य चालू केले आहे. पुढील २-३ वर्षांमध्ये हे कार्य पूर्ण केले जाईल.
३. भारत पूर्णपणे सक्षम होण्यासाठी ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ अतिशय महत्त्वाचा !
भारताने ‘जी २०’ देशांची एक बैठक अरुणाचल प्रदेशमधील ईटानगर येथे ठेवल्याने चीनचा नेहमीप्रमाणे तिळपापड झाला आणि त्याने त्यांचा प्रतिनिधी या बैठकीला न पाठवण्याचे घोषित केले. येत्या काळात चीनशी लढण्यासाठी भारताने पूर्णपणे सक्षम व्हायला हवे. त्यासाठी ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ अतिशय महत्त्वाचा आहे. बोगीबिल (ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला पूल) सारखे पूल, रस्ते, विमानतळ अशा अनेक सुविधांमुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षेच्या दृष्टीने भारत सक्षम होत आहे. त्यामुळे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ लवकर पूर्ण होईल, अशी आशा आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे