सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांना झालेले आध्यात्मिक त्रास आणि त्या कालावधीत त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
१. पू. भार्गवराम यांना झालेले आध्यात्मिक त्रास
‘३.१०.२०२१ या दिवशी रात्री ३ वाजल्यापासून सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु यांची प्रकृती अकस्मात् बिघडली. ३ दिवस त्यांना १०० ते १०३ अंश फॅरनहाइट ताप येत होता. त्यानंतर त्यांना पुष्कळ खोकला येऊ लागला. त्या वेळी त्यांना झालेले त्रास पुढे दिले आहेत.
अ. औषधे देऊनही त्यांचा ताप न्यून होत नव्हता. त्यांना भ्रम (hallucinations) होत होता.
आ. तापामुळे त्यांचे पूर्ण अंग काळवंडले होते.
इ. खोकला वाढल्यामुळे फवार्यातून द्यायचे सर्वसामान्य औषध (nebulisation) मंगळुरूच्या मोठ्या रुग्णालयातसुद्धा मिळाले नाही. रात्री १२.३० वाजता औषध १ घंटा शोधल्यानंतर एका दुकानात मिळाले.
ई. पू. भार्गवराम यांचे दोन्ही तळहात थंडगार पडले होते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांना भीती वाटू लागली.
‘काळ कठीण असल्यामुळे अनेक साधक आणि संत यांना त्रास होत आहेत’, असे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितले.
२. या कालावधीत पू. भार्गवराम यांचे मोठ्यांसारखे परिपक्व वर्तन अनुभवता येणे
अ. ते सलग ४ दिवस सर्दीचे कडू औषध आणि अन्य औषधे मोठ्या माणसांसारखे स्वतःच्या हाताने घेत होते.
आ. थकवा असल्यावर सर्वसाधारणतः लहान मुले चिडचिड करतात आणि रडतात; परंतु या वेळी पू. भार्गवराम पुष्कळच शांत होते.
इ. त्याच वेळी माझी प्रकृती बरी नव्हती. मी पू. भार्गवराम यांना औषधे देत होते. तेव्हा ते औषध घेतल्यानंतर मला विचारत होते, ‘‘आई, तू औषध घेतलेस कि नाही ?’’
ई. रात्री मला खोकला आला, तर पू. भार्गवराम त्वरित उठून माझा खोकला थांबेपर्यंत माझ्या छातीवरून हात फिरवत असत.
उ. कुणीही त्यांच्या खोलीत त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांची विचारपूस करायला आले, तर ते झोपेतून उठून त्यांना प्रतिसाद द्यायचे.
ऊ. सद़्गुरु गाडगीळकाकांनी त्यांना दिवसभरात एकूण ५ – ६ घंटेे नामजप करायला सांगितला होता. नामजपाच्या कालावधीत ते जागे रहात असत. ‘नामजप परिणामकारक होत आहे ना ?’, याकडे ते लक्ष देत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
ए. त्यांची दृष्ट काढतांना ते नारळाची शेंडी किंवा लिंबू यांकडे गांभीर्याने पहात होते. ‘त्यांना लागलेली दृष्ट उतरत आहे आणि त्रास न्यून होत आहे’, असे जाणवले’, असे ते सांगत होते.
ऐ. पू. भार्गवराम यांनी सायंकाळी खोलीचा पडदा उघडून सूर्यनारायणाचे ऊन आत येऊ दिले. खोलीतील उजेडाकडे पाहून त्यांनी ‘आता खोली किती चांगली वाटत आहे !’, असे सांगितले.
ओ. जेव्हा पू. भार्गवराम झोपले होते, तेव्हा मी गुरुदेवांना मनातल्या मनातच विचारत होते, ‘मी काय करू, ज्यामुळे पू. भार्गवराम बरे होतील ?’ त्या वेळी माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. पू. भार्गवराम यांनी झोपेतून उठून मला सांगितले, ‘‘आता मी बरा आहे. परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत ना ! मग काही भीती नाही. ते सर्वांचे रक्षण करत आहेत.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.
या कालावधीत पू. भार्गवराम यांच्यातील ‘समजूतदारपणा, परिस्थिती स्वीकारणे, स्वतःची प्रकृती बरी नसूनही इतरांचा विचार करणे, आज्ञापालन आणि गुरुदेवांवरील श्रद्धा’, हे गुण मला शिकायला मिळाले.
या प्रसंगातून मला गुरुदेवांची अखंड कृपादृष्टी अनुभवायला मिळाली. ‘चिंता न करता सर्वकाही गुरुदेवांच्या इच्छेनुसार होईल’, असे विचार मनात येऊन मला स्थिर वाटत होते. ‘गुरुदेवजी, ही केवळ आपलीच कृपा आहे. आपल्या चरणी शतकोटी नमस्कार !’
– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई),मंगळुरू.
|