देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर ताण निर्माण होईल !
|
मुंबई – देशाचा राजा कायम राहील; मात्र राजा कायम तणावात राहील. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर ताण निर्माण होईल, तसेच आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण राहील. घुसखोरी आणि रोगराई वाढेल, अशी भविष्यवाणी श्री पुंजाजी महाराज आणि श्री शारंगधर महाराज यांनी २३ एप्रिल या दिवशी घटमांडणीद्वारे वर्तवली. भेंडवळ येथे घटमांडणी करून भविष्य वर्तवण्याची परंपरा ३५० वर्षे जुनी आहे. ही भविष्यवाणी शेतकर्यांच्या उपस्थितीत पार पडली. संपूर्ण शेतकरी वर्ग या मांडणीचे भाकीत ऐकून पीक पेरणी करत असतात. त्यामुळे घटमांडणीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असते.
अशी करतात घटाची मांडणी !
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावाबाहेरील शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात आली. या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी ,वाटाणा, मसूर आणि करडी अशी १८ प्रकारची धान्ये ठेवण्यात आली. मध्यभागी मातीची ४ ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली. घागरीवर पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी, कुरडई, भजे, वडे हे खाद्यपदार्थ ठेवले गेले. रात्रभर तेथे कुणीही नागरिक गेले नाहीत. २३ एप्रिल या दिवशी सकाळी या धान्याच्या झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून श्री पुंजाजी महाराज आणि श्री शारंगधर महाराज यांनी पीक अन् पाऊस यांचा अंदाज व्यक्त केला.
कथन केलेली भविष्यवाणी !
१. ४ ढेकळांवर ठेवलेल्या घागरीमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे या वर्षी पावसाळा साधारण होईल. पहिल्या जून मासात पावसाळा कमी राहील. कुठे पाणी कमी, तर कुठे जास्त पडेल. त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही. जुलैमध्ये पावसाळा साधारण राहील. ऑगस्ट महिन्यात अधिक पावसाळा होईल. सप्टेंबर मासात कमी पाऊस येईल; परंतु अवकाळी पाऊस राहील. त्यामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे.
२. तूर आणि ज्वारी यांचे पीक चांगले येईल. मूग, उडीद पीक साधारण राहील. बाजरी पीक चांगले येईल; परंतु नासाडी होईल. गव्हाचे पीक चांगले येईल आणि त्याला चांगला भाव मिळेल. हरभरा पीक साधारण येईल. तांदुळाचे पीक चांगले येईल. बाजरी पीक साधारण येईल; पण नासाडी होईल.
३. देशात रोगराईचे संकट येईल, देशात घुसखोरी होईल. देशासहित जगावर रोगराई संकट येईल.
४. देशाचे संरक्षण खाते बळकट राहील. संरक्षण खात्याला परकीय घुसखोरीचा सामना करावा लागेल. त्यामुळे देश आणि राजा तणावाखाली राहील. या वर्षी आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण राहील.