सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचे जीवन बालपणापासूनच खडतर होते. त्यांनी अनेक त्रास सहन करून मुलींना वाढवले. हे खडतर जीवन जगत असतांना त्यांनी त्याविषयी एकदाही देवाकडे गार्हाणे केले नाही. त्यांनी आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारली. उतारवयात त्यांचा संपर्क सनातनच्या साधकांशी झाला आणि त्यांनी नामजपाला आरंभ केला. त्यानंतर त्यांचा नामजप अखंड होऊ लागला. नंतर त्या संतपदी विराजमान झाल्या. पू. आजींचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
(भाग १)
१. पू. आईंचे बालपण
१ अ. सात्त्विक कुटुंब : ‘पू. आईंचा जन्म नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावी झाला. त्यांना ५ बहिणी आणि १ भाऊ, अशी ६ भावंडे होती. पू. आईंचे आई-वडील प्रामाणिक आणि सात्त्विक वृत्तीचे होते. त्यांचे आई-वडील शेतकरी होते. त्यांची पुष्कळ मोठी भूमी होती. त्यांचे वडील शेती करायचे. पू. आईंचे आई-वडील धार्मिक होते. त्यांचे वडील ‘बहिरोबा’ या देवाचे भक्त होते. त्यांच्यावर बहिरोबाची कृपा असल्याने त्यांना इतरांना चावलेल्या सापाचे विष उतरवता येत असे. त्यामुळे अनेक गावांतून लोक त्यांच्याकडे येत असत.
१ आ. ७ – ८ मासांच्या असतांना बालविवाह होणे आणि वयाच्या चौथ्या वर्षी पतीचा मृत्यू होणे : पू. आईंचे पहिले लग्न त्या पाळण्यात असतांनाच पाळण्याला बाशिंग (टीप) बांधून झाले. तेव्हा त्या ७ – ८ मासांच्या असतील. नवरा मुलगा साधारण ८ – ९ वर्षांचा होता. दोघांनाही काही कळत नव्हते. पू. आईंना त्यांच्या आत्याच्या घरीच दिले होते.
टीप – विवाहाच्या वेळी काही जातींत वधू आणि वर यांच्या कपाळावर बांधले जाणारे आभूषण.
त्यांच्या पतीवर त्यांच्या भावकीतील लोकांनी करणी केली. त्यातच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्या वेळी पू. आई साधारण ४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या सासू-सासर्यांचासुद्धा करणीमुळेच मृत्यू झाला. पू. आई बालपणातच विधवा झाल्या. त्यांच्या सासरची सर्व भूमी त्यांच्या भावकीतील लोकांनी लुबाडून घेतली. त्या परत कधीच सासरी गेल्या नाहीत. त्या आई-वडिलांकडेच राहिल्या.
१ इ. भावंडांना सांभाळणे आणि शेतीची कामे करणे : त्यांच्यासह त्यांची भावंडे असायची. पू. आई त्यांना सांभाळायच्या आणि त्यांची काळजी घ्यायच्या. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना शेतीची कामे करण्यास वेळ मिळायचा. पू. आई शाळेत गेल्या नाहीत. त्या घरीच राहून शेतीची कामे करायच्या. त्या ‘ज्वारीच्या पिकांची राखण करणे, शेळ्यांना शेतात चरायला नेणे, शेणी (गोवर्या) करणे, चुलीत घालण्यासाठी शेतातून लाकडे आणणे’, अशी कामे करायच्या. त्या त्यांच्या वडिलांना शेतीच्या कामांत पुष्कळ साहाय्य करायच्या.
१ ई. साधनेची आवड : पू. आई बहिरोबाचे मंदिर आणि समोरचा परिसर झाडून स्वच्छ करायच्या. त्यांना त्याची आवड होती. त्या दिवसभर मंदिरातच खेळायच्या. नवरात्रीमध्ये गावातील लक्ष्मीदेवी आणि बहिरोबा यांच्या मंदिरात घटस्थापना असायची. पू. आई घटाला माळ घालण्यासाठी नियमित मंदिरात जायच्या.
२. दुसरा विवाह होणे आणि सासरी सवतीकडून पुष्कळ त्रास सहन करावा लागणे
पू. आई १२ – १३ वर्षांच्या झाल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा दुसरा विवाह करून दिला. पू. आईंचा ज्यांच्यासह विवाह झाला, त्यांचा आधीच एक विवाह झाला होता आणि त्यांची पहिली पत्नीसुद्धा हयात होती. ती सतत माहेरीच रहायची; म्हणून त्यांनी पू. आईंसह दुसरे लग्न केले. पू. आईंचे सासर मांडवगण (नगर) येथील होते. सासू-सासरे, चुलत सासरे, दीर-जाऊ, आतेसासू, असे त्यांचे मोठे कुटुंब होते. त्या लग्न होऊन घरी गेल्या आणि त्यांची सवत परत लगेचच नांदायला आली. पू. आईंच्या सासूबाई पू. आईंना पुष्कळ प्रेम द्यायच्या. पू. आईंच्या सवतीचे आणि सासूबाईंचे सतत भांडण व्हायचे. त्यांना आणि त्यांच्या सवतीला वेगवेगळ्या घरांत ठेवले; कारण त्यांची सवत त्यांच्याशी सतत भांडायची.
पू. आई सासू-सासर्यांच्या जवळ रहायच्या. त्यांची सवत एकटीच रहायची. पू. आईंच्या जाऊबाई सासूबाईंनी सांगितलेली सर्व कामे ऐकायच्या. त्यांच्यात आणि सासूबाईंच्यात कधीच भांडणे होत नसत.
३. सवतीने आणि सवतीच्या मुलीने खोटा आरोप करून पू. आईंना पुष्कळ मारणे
पू. आई एकदा दळण दळायचे जाते (धान्य दळण्यासाठी वापरायचे दगडी गोलाकार यंत्र) आणण्यासाठी सवतीच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या सवतीने आणि सवतीच्या मुलीने ‘आमचे कपडे चोरण्यासाठी आल्या आहात’, असा खोटा आरोप करून त्यांना पुष्कळ मारले. पू. आईंनी ते सर्व सहन केले. त्या वेळी पू. आईंच्या पुतण्याने मध्यस्थी केली.
४. पू. आईंच्या सवतीने करणी करून पू. आईंची ३ मुले मारून टाकणे
पू. आईंची सवत त्यांच्या पतीला पू. आईंकडे येऊ देत नव्हती. ती सतत भांडायची. त्यांच्या सवतीला मुलीच होत होत्या. मुलगा होत नव्हता. पू. आईंना ३ मुले झाली. त्यांच्या सवतीने करणी करून त्या तीनही मुलांना मारले. ते दुःख पू. आईंनी पचवले. त्यांच्या केवळ दोन मुली जगल्या.पू. आईंनी हे सर्व सहन करून सासरच्या सर्वांना प्रेमच दिले.
५. कठीण परिस्थितीतही देवावर श्रद्धा असणे
पू. आई आणि त्यांच्या जाऊबाई पहाटेच ४ वाजता उठून जात्यावर ज्वारी, बाजरी आणि गहू ही धान्ये दळायच्या अन् त्याच पिठाच्या तीन जण जेवतील, एवढ्या भाकर्या आणि पोळ्या बनवायच्या. सर्व स्वयंपाक करून त्या सकाळीच शेतात कामाला जायच्या. हे सर्व करत असतांना पू. आई वेगवेगळ्या मंदिरांतसुद्धा जायच्या. त्यांना देवदर्शनाची पुष्कळ आवड होती. त्यांच्या गावातच सिद्धेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते.
पू. आई प्रत्येक एकादशीला त्या मंदिरात जायच्या. त्या उपवास करायच्या. त्यांचा भोळा भाव होता.
६. कष्ट करून मुलींचा सांभाळ करणे
मुलींना सांभाळण्यासाठी पू. आईंना त्यांची सवत पतीला कधीच पैसे देऊ देत नसे. त्यामुळे त्यांना पती असूनसुद्धा मुलींना मोठे करण्यासाठी लोकांच्या घरी कामे करायला लागायची. त्या लोकांच्या घरी मिरची कुटून देण्यासाठी जायच्या, तसेच लोकांच्या घरची स्वच्छता आणि शेतात मजूरी करायच्या अन् मिळेल त्या पैशांतून मुलींचे पालनपोषण करायच्या.
७. प्रामाणिकपणा
अ. लोकांच्या घरी त्या पुष्कळ प्रामाणिकपणे कामे करायच्या. एकदा एका व्यापार्याच्या घरी स्वच्छतेच्या वेळी गादी गुंडाळून ठेवतांना त्यांना गादीखाली पैशांचे बंडल दिसले. त्यांनी प्रामाणिकपणे ते पैसे त्या व्यापार्याच्या पत्नीला दिले. त्यांच्या या प्रामाणिकपणासाठी त्या व्यापार्याने आणि त्यांच्या पत्नीने त्यांना बक्षिस म्हणून ५० रुपये दिले. ‘तेसुद्धा घ्यायला नको’, असे त्यांना वाटायचे. त्यांनी बिकट परिस्थितीतसुद्धा कधीही कुणाकडून बिना कष्टाचे पैसे घेतले नाहीत.
आ. एकदा त्यांना सोन्याचे कानातले सापडले होते. तेसुद्धा त्यांनी ‘ते कुणाचे आहेत ?’, हे शोधून त्यांना परत केले. त्याविषयी त्यांना मोह झाला नाही.
८. गहू देण्याचे निमित्त करून सवतीने पू. आईंना शेतात नेणे, तेथे त्यांना मारून ढकलून देणे आणि त्या वेळी दिराने त्यांना साहाय्य करणे
गुढीपाडव्याच्या दिवशी घरात पोळ्यांसाठी गहू नसतांना पू. आईंनी यजमान आणि सवत यांच्याकडे गहू मागितले. सवतीने त्यांना ‘घरी गहू देते’, असे सांगितले. सवतीचे घर शेतात होते. तिने पू. आईंना २ कि.मी. चालत नेऊन रस्त्यात कुणी नसल्याचे पाहून मारून ढकलून दिले. पू. आईंच्या दिरांना हे कळल्यावर त्यांनी पू. आई आणि मुली यांच्यासाठी जावेला स्वयंपाक बनवायला सांगितला अन् पू. आईंना तो आणून दिला. त्यांचे दीर आणि जाऊ पुष्कळ चांगले होते. ते त्यांना पुष्कळ साहाय्य करायचे. त्यामुळे त्यांचा पू. आईंना पुष्कळ आधार वाटायचा. त्यांच्या नणंदा, दीर आणि जाऊ त्यांना पुष्कळ सांभाळायचे; कारण पू. आई सर्वांशी प्रेमाने वागायच्या.
९. सवतीने शेतात पिकलेले धान्य न देणे आणि पू. आईंनी कुळथाच्या खाली पडलेल्या शेंगा वेचून आणून त्या मुलींना खाऊ घालणे
पू. आईंचा आणि त्यांच्या सवतीचा शेतजमिनीवर समान अधिकार होता; पण त्यांना त्यांची सवत शेतात पिकलेले धान्य देत नव्हती. पू. आईंनी मागितले, तर सवत त्यांना मारायची. पू. आई लोकांच्या शेतात कामाला जायच्या. पू. आई लोकांनी कुळथाचे पीक काढून नेल्यावर कुळथाच्या खाली पडलेल्या शेंगा दिवसभर वेचून आणायच्या आणि त्यांची भाजी बनवून मुलींना खाऊ घालायच्या.
१०. खडतर परिस्थिती स्वीकारणे
पू. आईंचे जीवन पुष्कळ खडतर होते. या खडतर जीवनाविषयी त्यांनी देवाकडे कधी तक्रार केली नाही. देवाने दिलेली परिस्थिती स्वीकारून त्या जगत होत्या. त्या प्रत्येक मंगळवारी गावातल्या देवीला नैवेद्य घेऊन जायच्या.’
(क्रमशः)
– श्रीमती इंदुबाई भुकन (पू. लोखंडेआजींची मुलगी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२२)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/676664.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |