पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनास प्रारंभ !

दीपप्रज्वलन करतांना सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, त्यांच्या शेजारी पंडित जितेंद्र शुक्लाजी, ह.भ.प. भरत महाराज, कु. रागेश्री देशपांडे

जळगाव, २३ एप्रिल (वार्ता.) – ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन से जुदा’ असे गाणे वाजवले जाते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अतिरेकी कारवाया वाढत आहेत. ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य होत आहेत, हे चिंतनीय आहे. हिंदुविरोधी कारवायांत निधर्मी, इस्लामिक, ख्रिस्ती मिशनरी आणि कम्युनिस्ट यांची अभद्र युती पुढे आहे. त्यामुळे पुढील पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ते प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.

‘लाना होगा लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा !’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’ या घोषणांच्या निनादात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय प्रांतीय अधिवेशनास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. २३ एप्रिल या दिवशी हॉटेल क्रेझी होम येथे पार पडलेल्या या अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योजक यांचे १४० प्रतिनिधी उपस्थित होते.

सनातनचे धर्मप्रचारक सदगुरु नंदकुमार जाधव यांच्या वंदनीय, तसेच प्रज्ञा सेवा धाम नंदगावचे पंडित जितेंद्र शुक्लाजी, ह.भ.प. भरत महाराज, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले.

या अधिवेशनात लव्ह जिहाद, भूमी जिहाद, गोरक्षण, धर्मांतर, गड-दुर्ग संरक्षण, तसेच धर्मद्रोह्यांकडून हिंदू आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात केला जाणारा अपप्रचार आदी आघातांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दुपारच्या सत्रात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात माझी भूमिका काय असणार ?’ या विषयावर गटचर्चा आयोजित करण्यात आली. शेवटच्या सत्रात विधिसंवाद आणि परिसंवाद घेण्यात आला. समारोपीय सत्रात सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘आपत्कालीन सिद्धता’ या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री. निखिल कदम यांनी केले.

विशेष : अधिवेशनादरम्यान ‘पांडव वाडा जतन आणि संवर्धन’, तसेच ‘यावल दुर्ग जतन आणि संवर्धन’ या दोन कृती समितींची घोषणा करण्यात आली.

श्री हनुमान चालिसेच्या माध्यमातून गावागावांतील हिंदूंना संघटित करू ! – कमलेश कटारिया, हिंदु राष्ट्र संकल्प अभियान संस्थापक सदस्य, सिल्लोड

बोलतांना श्री. कमलेश कटारिया

कालपर्यंत शहरातील सिल्लोड येथील एका भागात हिंदू बहुसंख्यांक होते; मात्र आज तेथे हिंदूंची केवळ ४ घरे शेष राहिली आहेत. तेथील व्यावसायिक शहरात जागा विकत घेऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही. एखादा हिंदु स्वतःचे घर बांधू शकत नाही. कारण नगरपरिषदेत अनुमतीसाठी अनेक वेळा विनाकारण खेटे घालावे लागतात. पक्षहितापेक्षा धर्मांधांनी धर्महित जोपासून जिहादी प्रभाव निर्माण केला आहे. यासाठी आम्ही ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ गावागावात राबवत आहोत. श्री हनुमान चालिसा प्रति शनिवारी आयोजित करण्यात येत असून हे अभियान आता १०० हून अधिक गावांत पोचले आहे. याद्वारे ८ सहस्र हिंदू संघटित झाले आहेत. यापुढे हे अभियान व्यापक करून उर्वरित हिंदूंना संघटित करू, असे प्रतिपादन श्री. कटारिया यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय प्रांतीय अधिवेशनप्रसंगी बोलत होते.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करून धर्माचरणी बनूया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘येणारा काळ हा महाभयंकर आपत्काळ म्हणजे संकटांचा काळ आहे’, असे अनेक संत, भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे. फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस, प.पू. गगनगिरी महाराज, देव हालसिद्धनाथ यांनी सांगितलेली बरीच भविष्ये खरी ठरली आहेत. वर्ष २०१८ च्या भविष्यवाणीत त्यांनी कोरोनासारख्या महामारीविषयी सांगितले होते. ते तंतोतंत खरे ठरले. तिसर्‍या महायुद्धाविषयीही त्यांनी सांगून ठेवले आहे. तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार असेल की, पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील. सध्याची जागतिक परिस्थिती पहाता तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी केव्हाही पडू शकते. भूकंप, उष्णतेची लाट, महापूर, टोळधाड, वादळे यांसारख्या नैसर्गिक संकटांची मालिका चालू आहे. हा सर्व कालचक्राचा परिणाम आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे. हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करून धर्माचरणी होऊया.

आज स्त्रियांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्यक ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्राचा उद्घोष चालू आहे. भारत हिंदु राष्ट्र होईल; म्हणून शेजारील राष्ट्र चिंतेत आहेत. नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मोर्चे निघत आहेत. देहलीसारख्या ठिकाणी धर्मसंमेलन होत आहे. या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजातील स्त्रियांचेही योगदान आवश्यक आहे. ज्याप्रमाणे जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि साकार करून घेतले, त्याप्रमाणे आज स्त्रियांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्यक आहे.

हिंदूंनी सजग राहून दर्गामुक्त कान्हादेश निर्माण करणे आवश्यक ! – स्वामी ब्रह्मानंद राहुल चौधरी, गिरणारी दत्तपीठ, भुसावळ, जळगाव

मोगल काळापासूनच लँड जिहाद चालू आहे. देशभरात नाथ संप्रदायाच्या ठिकठिकाणी समाधी आहेत. या समाधींवरील भगवे वस्त्र काढून हिरवी चादर घातली गेली. अजमेर येथील दर्गा म्हणजे मच्छिंद्रनाथांची तर गैबनशहा दर्गा म्हणजे गहिनीनाथांची समाधी आहे. यांनाच मजारीचे रूप दिले जाते. चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे पूर्वी केवळ मुसा काद्री दर्गा होता. आता तेथे मोठी मशीद करण्यात आली आहे. नाथांच्या समाधीवर केलेले हे अतिक्रमणच आहे. हिंदूंनी सजग राहून दर्गामुक्त कान्हादेश करणे आवश्यक आहे.

शेवटी उपस्थित धर्मप्रेमींनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे लढा देऊ’, असा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.

सहभागी संघटना : हिंदु राष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम ग्रुप, रामराज्य ग्रुप, संकल्प हिंदुराष्ट्र अभियान, भगवान गोशाळा, रामराज्य प्रतिष्ठान, जय श्रीराम मंडळ, शिवशंभू प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, एक दिवस राजांसाठी, नीर फाउंडेशन, जळगाव जिल्हा वकील असोसिएशन, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, वारकरी संप्रदाय

सहभागी पक्ष : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, भारतीय जनता पक्ष

मनोगत

१. भगवंताने आपली निवड केली आहे, असे जाणवले. आज पहिल्यांदाच मी एवढा वेळ कार्यक्रमाला बसलो. – श्री. अनिल चौधरी, योग वेदांत सेवा समिती, जळगाव

२. प्रत्येक हिंदु व्यक्तीच्या घरात लाठी असायला हवी. – श्री. सुरेश कोठारी, जळगाव

३. अधिवेशनातील अनुभव शब्दांत वर्णन करता येणार नाही. प्रत्येक शब्द, वाक्य महत्त्वाचे होते. प्रत्येक जण ‘हिंदु राष्ट्र’ या एका ध्येयाने प्रेरित आहे. प्रत्येकात काहीतरी शिकण्यासारखे आहे. – प्रा. प्रशांत पाटील, चोपडा

४. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र लवकरच स्थापन होईल. – कु. ओम पाटील, ऊपळी, जिल्हा संभाजीनगर

५. छत्रपती शिवरायांचा पुतळा गावात उभा करण्यास विरोध होत होता. त्याविरोधात कायदेशीर लढा दिला. सनातन धर्माच्या सत्य मार्गावर चालतांना विजय नक्की मिळतो. – श्री. सांडू अण्णा पाटील, ऊपळी, जिल्हा संभाजीनगर

६. अनेक संघटनांचे कार्य पाहिले; पण समितीचे कार्य अतिशय उत्कृष्ट आहे. – श्री. अमन जोहरी, दोंडाईचा

७. समितीच्या कार्याविषयी कोणतेही दुमत नाही. रणरागिणी शाखेच्या कार्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हायला हवे. – अधिवक्ता गायत्री वाणी, धुळे