जळगाव, पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारणार ! – पालकमंत्री
जळगाव जिल्ह्यासाठी १२१ इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार !
जळगाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या पर्यावरणपूरक १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाने मान्यता दिली आहे. यात पाचोरा २१, मुक्ताईनगर १७, चोपडा २१, तर इतर भागांसाठी ६२ बसगाड्या संमत झाल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव, पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर येथे बसगाड्यांच्या चार्जिंगसाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रक जळगाव यांना दिले आहेत.
जळगाव विभागात वर्ष २०१९ मध्ये ८३९ वाहने होती, तर सध्या ७२३ वाहने उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारणतः ५७ बसगाड्या मोडकळीस आल्या आहेत. विभागातील अनेक बसगाड्या जुन्या झालेल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे त्या विलंबाने धावतात, तर काही वेळेस फेर्या रहित कराव्या लागतात. त्यामुळे महामंडळाकडे लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या वारंवार तक्रारी येत. पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १०० साध्या बसगाड्या आणि १२१ इलेक्ट्रिक बसगाड्या मिळाव्यात, अशी मागणी केली होती.