रत्नागिरी जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या पाणीपातळीत झाली घट
रत्नागिरी – वाढत असलेला कडक उन्हामुळे भूगर्भातील पाणीपातळीवर परिणाम होत आहे. भूजल विभागाच्या वतीने एप्रिलच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या पाणीपातळीच्या नोंदीवरून रत्नागिरी, लांजा, गुहागर आणि दापोली या ४ तालुक्यांतील पाण्याची पातळी घटली आहे. उर्वरित मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या ५ तालुक्यांतील पाणीपातळी स्थिर असल्यामुळे एप्रिल मासाच्या शेवटपर्यंत टंचाईची तीव्रता तेवढीशी वाढणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
भूगर्भातील पाणीपातळीच्या नोंदी प्रतिवर्षी भूजल विभागाकडून घेतल्या जातात. या टंचाईच्या नोंदींचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जातो. वर्षभरात ४ वेळा या नोंदी घेण्यात येतात. यासाठी जिल्ह्यातील ६० विहिरी निश्चित केलेल्या आहेत. मार्च मासाच्या शेवटी आणि एप्रिल मासाच्या प्रारंभी जिल्ह्यात अवेळी आलेल्या पावसामुळे काही भागांतील पाणीपातळी स्थिर राहिली आहे. भूजल विभागाच्या दिलेल्या अहवालानुसार, पातळी घटलेल्या तालुक्यांत काही ठिकाणी पाणीटंचाई जाणवणार आहे, तर पातळी स्थिर असलेल्या तालुक्यात टंचाईची तीव्रता तेवढी जाणवणार नाही. यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस उशिराने चालू होण्याची शक्यता आहे.
(अल निनो – प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणार्या हवामान पालटास अल निनो असे म्हणतात. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानपालटाला कारणीभूत ठरतेय. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो.)
मे मासाच्या प्रारंभी भूजल विभागाकडून घेण्यात येणार्या नोंदीमधून मे मासातील पुढील २० दिवसातील टंचाईचे चित्र स्पष्ट होईल.