समृद्धी महामार्गावर अडीच मासांत ४२२ अपघात : ४७ जणांचा मृत्यू !
चालकाला डुलकी लागणे, अतीवेग आदींमुळे अपघात
नागपूर – काही मासांपासून चालू झालेल्या समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ च्या पंधरवड्यापर्यत या महामार्गावर एकूण ४२२ अपघात झाले असून त्यांत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. यांत २२ पुरुष, २२ महिला आणि ३ लहान मुले यांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी २१ एप्रिल या दिवशी दिली. महामार्ग चालू झाल्यापासून अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत असल्याने अनेक जण येथून प्रवास करण्याचे टाळत आहेत.
पुनर्बांधणी केलेले (रिमोल्डिंग) टायर वापरू नका !
संजय यादव म्हणाले की, अपघाताची शक्यता असल्याने समृद्धी महामार्गावर घासलेले टायर असलेली वाहने रोखली जात आहेत. या मार्गावर प्रवास करण्यासाठी नायट्रोजन वायू भरलेले टायर उपयुक्त आहेत. त्यासाठी महामार्गावरील सर्व पेट्रोलपंपांवर नायट्रोजन वायू भरण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. येथे प्रवास करण्यासाठी चांगले टायर असणे आवश्यक आहे. पुनर्बांधणी केलेले (रिमोल्डिंग) टायर वापरणे चुकीचे आहे.
३ लाख ५४ सहस्र २८३ वाहनांनी भरला २० कोटी पथकर !
समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर २०२२ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गावरून केवळ १ मासाच्या कालावधीत एकूण ३ लाख ५४ सहस्र २८३ वाहनांनी अनुमाने २० कोटी २ लाख रुपयांचा पथकर दिला आहे.
अपघातांची कारणे आणि अपघात टाळण्यासाठीचे उपाय
चालकाला डुलकी लागणे, अतीवेग, चालकाचे नियंत्रण सुटणे, अतीभार असलेले वाहन चालवणे, ताण, रस्ता संमोहन (वाहन चालवतांना दृष्टी शून्यात जाणे), लक्ष विचलित होणे आदी कारणांमुळे अपघात झाले आहेत. अपघात होऊ नयेत; म्हणून समृद्धी महामार्गावर बहुतांश ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे, तसेच वन्यप्राणी आडवे येऊ नयेत; म्हणून ‘क्रॅश बॅरिअर’च्या बाजूने तारेचे कुंपण बांधण्यात येत आहे. बुथवर ‘सार्वजनिक सूचना प्रणाली’ही बसवली जात आहे.
लवकरच ‘इंटेलिजंट ट्रान्सस्पोर्ट सिस्टिम’ लावणार !
समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. रहदारी आणि नियंत्रण यांसाठी ’इंटेलिजंट ट्रान्सस्पोर्ट सिस्टिम (आय.टी.एस्.) लवकरच लावण्यात येणार आहे. महामार्गावर १३ इंधनस्थानके असून या व्यतिरिक्त आणखी १६ ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया प्रगती पथावर आहे, असेही संजय यादव यांनी सांगितले.