अक्षय्य तृतीया सण !
आज अक्षय्य तृतीया त्यानिमित्ताने…
कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.
१. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान
या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.
२. उद्देश
अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे
आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.
३. उदकुंभ दानाचा मंत्र
ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा.
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।। – धर्मसिन्धु
अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत, असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.
४. शास्त्र
अक्षय्य तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशेबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या वेळी केलेले दान महत्त्वाचे ठरते.
५. पूर्वज
५ अ. महत्त्व : अक्षय्य तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय (अक्षय्य) तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तीलतर्पण करायचे असते.
५ आ. पद्धत : पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवावा. २ मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये पाणी सोडावे आणि दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)