‘गोवा डेअरी’चे १२ पैकी ७ संचालक अपात्र : प्रशासकीय समिती नियुक्त
कथित गैरव्यवहार प्रकरणी सहकार निबंधकांची कारवाई
पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) – गोवा सहकार निबंधकांनी कथित गैरव्यवहार प्रकरणी ‘गोवा डेअरी’तील १२ पैकी ७ संचालकांना अपात्र ठरवले आहे, तसेच यापूर्वी संचालक मंडळावर असलेल्यांनाही सहकार निबंधकांनी अपात्र ठरवले आहे. त्याचप्रमाणे नवीन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत ‘गोवा डेअरी’च्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी सनदी अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय प्रशासकीय समिती नियुक्त केली आहे. सहकार निबंधकांनी ‘गोवा डेअरी’च्या ६ कोटी रुपयांच्या कथित पशूखाद्य घोटाळ्याची स्वेच्छा नोंद घेऊन ‘गोवा डेअरी’च्या विद्यमान आणि माजी मिळून एकूण १८ संचालकांच्या विरोधात सुनावणी चालू केली होती. या प्रकरणी सहकार निबंधक विशांत गावणेकर यांनी २१ एप्रिल या दिवशी आदेश दिला आहे.
गोवा डेअरीचे 9 संचालक अपात्र; सहकार निबंधकांची कारवाई. 6 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सुरू होती चौकशी #Goa #GoaDairy #CoOperative #GoaDairyDirectos #Disqualification #GoaDairyScam
https://t.co/A1K7OAVJur— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) April 21, 2023
सहकार निबंधक आदेशात म्हणतात, ‘गोवा डेअरी’चे तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या निर्णयामुळे ‘गोवा डेअरी’ला महसूल स्वरूपात ६ कोटी रुपयांची हानी सोसावी लागली आहे. त्यामुळे यात दोषी आढळून आलेल्या ७ संचालकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये उल्हास सिनारी, राजेश फळदेसाई, विठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब आणि बाबूराव देसाई यांचा समावेश आहे, तर माधव सहकारी हे यापूर्वी संचालक होते; मात्र त्यांनी संचालकपदाचे त्यागपत्र दिले होते. माधव सहकारी यांनासुद्धा अपात्र ठरवण्यात आले आहे. विद्यमान संचालक मंडळावर सध्या केवळ उदय प्रभू, नितीन प्रभुगावकर, बाबू फाळू आणि श्रीकांत नाईक हेच राहिले आहेत. यापूर्वी संचालक मंडळावर असलेले बाबू कोमरपंत, माधवराव देसाई, राजेंद्र सावळ, धनंजय देसाई, शिवानंद पेडणेकर, अजय देसाई आणि अन्सेल्मो फुर्तादो यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे.
व्यवस्थापकीय संचालकांकडून हानीभरपाई वसूल करणार
‘गोवा डेअरी’चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. नावसो सावंत यांनी सेवेत निष्काळजीपणा केल्याने त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करण्यासाठी निराळी सुनावणी घेण्यात येणार आहे. यासाठी अहवाल अथवा प्रस्ताव सुपुर्द करण्याचा आदेश सहकार निबंधकांनी ‘गोवा डेअरी’ला दिला आहे.
प्रशासकीय समितीत कोण आहेत ?
सनदी अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय प्रशासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पशूसंवर्धन खात्याचे पशूचिकित्सक डॉ. रामा परब आणि लेखा खात्याचे अधिकारी संदीप रामनाथ परब पार्सेकर यांचा समावेश आहे. ही समिती प्रारंभी पुढील ६ मासांसाठी कार्यान्वित रहाणार आहे. नवीन संचालक मंडळाची नेमणूक होईपर्यंत प्रशासकीय समिती ‘गोवा डेअरी’चे कामकाज पहाणार आहे. ‘गोवा डेअरी’च्या राज्यातील १७९ दुग्ध सहकारी सोसायटी प्राथमिक सदस्य आहेत.