आतंकवाद संपवा !
पुंछ (जम्मू-काश्मीर) येथे भारतीय सैन्याच्या ताफ्यावर ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेने ग्रेनेड आक्रमण केले. त्यात ५ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. आतंकवाद्यांनी भारतीय सैन्यावर आक्रमण करणे ही घटना काही नवीन नाही. वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथेही केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याने ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. याआधी उरी येथील सैन्य तळावरही आतंकवाद्यांनी मोठे आक्रमण केले होते. काही कालावधीने पुनःपुन्हा अशा घटना घडतच रहातात. ‘मग हे सर्व थांबणार तरी कधी ?’, ‘भारतीय सैन्यावर आक्रमण करण्याचे आतंकवाद्यांचे धारिष्ट्य कसे होते ?’, ‘शस्त्रसज्ज आणि युद्धनिपुण असणार्या भारतात सैनिकांना त्यांचे प्राण का गमवावे लागतात ?’, ‘भारताकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे शत्रूराष्ट्राचे धाडसच होऊ नये, यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?’ हे आणि यांसारखे अनेक प्रश्न प्रत्येक भारतियाच्या मनात निर्माण होत असतील. अर्थात् याची उत्तरे सरकार आणि सैन्य दल यांनी द्यायला हवीत.
राष्ट्रनिष्ठ व्हा, आतंकवाद संपेल !
पुंछची घटना २० एप्रिलला घडली. त्याअगोदर काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकारांना सांगितले होते, ‘जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद अद्याप संपला नसला, तरी तो संपत चालला आहे. आताच्या स्थितीत आतंकवाद्यांची संख्या मग ती स्थानिक असो कि पाकिस्तानातून आलेल्यांची असो, ती अल्प झाली आहे. पुंछ येथील घटना पहाता पोलीस महासंचालकांनी स्वतःच्या विधानांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे; कारण जरी संख्या अल्प झाली असली, तरी मूठभर आतंकवाद्यांमध्ये भारतीय सैन्यावर आक्रमण करण्याचे धाडस निर्माण होते, ही भारतासाठी डोकेदुखीच आहे. ती कशी थांबवणार ? ५ सैनिक वीरगतीस प्राप्त झालेले असतांना ‘आतंकवाद संपत चालला आहे’, असे म्हणणे म्हणजे यापुढे वास्तवाचा विपर्यास केल्यासारखेच होईल. ‘सर्जिकल स्ट्राईक’ होण्यापूर्वी आतंकवाद्यांचे तळ काश्मीरमधील नियंत्रणरेषेजवळ होते. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर ते मागे नेण्यात आले; पण आता त्यांनी ते पुन्हा नियंत्रणरेषेजवळ आणले आहेत. या तळांवर प्रशिक्षित आतंकवादी असून ते येथून भारतात घुसखोरी करतात. असे जर असेल, तर आतंकवाद्यांची संख्या न्यून कशी होणार ? उलट ती दिवसेंदिवस वाढतच रहाणार. आतंकवादाचे दूरगामी परिणाम पहाता भारतानेच या तळांवर आक्रमण करून तेथील आतंकवाद्यांना ठार मारायला हवे.
पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना तेथील सैन्यावर युद्धबंदीचे उल्लंघन करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये अशा प्रकारे आतंकवादी कारवाया वाढत आहेत. ही सर्व स्थिती पहाता ‘आतंकवादी अल्प आहेत’, या भ्रमात पोलिसांनी राहू नये. जोपर्यंत आतंकवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत सर्वच स्तरांवर प्रयत्न करत रहाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक सैनिक देशासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याच्या प्राणांचे मोल आपण केलेच पाहिजे. आतंकवाद हा इतक्यात संपणारा नाही. जोपर्यंत पाकप्रेमाचा पुळका जात नाही किंवा तो पुळका असणार्यांना भारतातून हद्दपार केले जात नाही, तोपर्यंत आतंकवाद नष्ट होण्याची सुतरामही शक्यता नाही. जेव्हा सर्व नागरिक राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रनिष्ठ होऊन राष्ट्रकर्तव्ये पार पाडतील, सरकारही प्रतिदिन राष्ट्रानुकूल ध्येय-धोरणे राबवेल, राष्ट्रहितैषी भूमिका घेईल, तेव्हाच आतंकवाद संपुष्टात येईल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
‘पर्यटन परिषदे’चे प्रभावी माध्यम !
२२ ते २४ मे २०२३ या कालावधीत श्रीनगरमध्ये ‘जी-२०’ अंतर्गत ‘पर्यटन परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या परिषदेसाठी विदेशी प्रतिनिधी भारतात आले आहेत. पुंछ येथील घटना ही विदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार करण्यास भाग पाडणारी आहे. त्यामुळे सुरक्षायंत्रणांनीही सतर्कता बाळगायला हवी. या परिषदेच्या पूर्वी किंवा परिषद काळामध्ये आतंकवादी आक्रमणाचे गालबोट लागू नये, यादृष्टीनेही दक्षता घ्यायला हवी. अन्यथा ‘ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर तेथील परिस्थिती शांत आहे’, हा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यासाठी आयोजित केलेल्या परिषदेचा केंद्र सरकारचा उद्देशच निष्प्रभ ठरेल ! आधीच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आलेली असली, तरी ‘ते राज्य पूर्णतः सुरक्षित झालेले आहे’, असे नाही; कारण अद्याप कुणीही तेथे रहायला जाण्याचा विचारच करू शकत नाही. थोडक्यात काय, तर जम्मू-काश्मीर हे अस्थिर आणि असुरक्षित राज्य आहे. त्याला सुरक्षितता मिळवून देण्यासाठी ‘ही परिषदही मोठे माध्यम ठरू शकते’, हे सरकारने लक्षात घ्यावे. या परिषदेमध्ये भारताने कुरघोडी करणार्या पाकच्या विरोधातील भूमिका मांडून ‘आतंकवादमुक्त भारता’चा पुरस्कार करावा. ‘पाक डावपेचांत भारतापेक्षा हुशार आहे’, असे नेहमीच म्हटले जाते. भारताला तर युद्धाचा परंपरागत उज्ज्वल इतिहास लाभला आहे. मग असे असतांना भारत मागे का ? भारताने आपली हुशारी, दूरदृष्टी आणि युद्धचातुर्य दाखवून द्यायला हवे. ‘प्रत्येक वेळी आतंकवादीच ठार झाले पाहिजेत. एकही सैनिक आतंकवाद्यांच्या हातून मारला जाणार नाही’, असा निश्चय करायला हवा. आतापर्यंत भारतातील सर्वपक्षीय सरकारे आतंकवाद नष्ट करण्यात अपयशी ठरलेली आहेत. त्यामुळे स्थानिक हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी बंदुका चालवणे शिकून घेण्यास प्रारंभ केला आहे. खरे पहाता सरकार किंवा पोलीस रक्षण करू शकत नसल्याने हिंदूंवर अशी वेळ येणे हे संरक्षण व्यवस्थेचे अपयशच आहे. जोपर्यंत आपण पाकला धडा शिकवत नाही, तोपर्यंत आतंकवादाचे समूळ उच्चाटन होणार नाही. अन्यथा भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होईल. ‘आतंकवादाची तलवार डोक्यावर किती काळ टांगती ठेवायची ?’, हे सरकारने वेळीच ठरवावे आणि सर्वांनाच सुरक्षित वातावरण प्रदान करावे, ही अपेक्षा !