‘प्रीवेडिंग शुटींग’वर बंदी घालण्याचा निर्णय घेणारा गुरव आणि माहेश्वरी समाज !

हिंदु धार्मिक विधींनुसार विवाह होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत !

संग्रहित छायाचित्र

सध्या विवाहाच्या पूर्वी वधूवरांचे ‘प्रीवेडिंग शुटींग’ (लग्नापूर्वीच्या छायाचित्रणावर) केले जाते. यामध्ये वधू-वर पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालतात आणि वधू-वरांच्या वैयक्तिक क्षणांची छायाचित्रे काढून, तसेच प्रसंगी नृत्य करतांनाचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ बनवला जातो. हा व्हिडिओ विवाहाच्या वेळी मोठ्या पडद्यावर दाखवला जातो.

अशा प्रकारचे ‘प्रीवेडिंग शुटींग’ करणे आणि ते विवाह संमारंभामध्ये दाखवणे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासारखे आहे. त्यामुळे यावर नंदूरबार येथील गुरव समाजाने बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे, तसेच ‘साखरपुड्याचा कार्यक्रम थोडक्यात करावा, अल्प लोकांना लग्नाला घेऊन जावे, फक्त पाचच साड्या घ्याव्यात, अनावश्यक खर्च वाचण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावा, मंदिरात विवाह करण्यास प्राधान्य द्यावे, विवाहात आहेर मोजका आणि जवळच्या नातेवाइकांनाच द्यावा’, असे ठराव करण्यात आले.

सोलापूर येथील माहेश्वरी समाजानेही ‘प्रीवेडिंग शुटींग’वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विवाह सोहळ्यात अनावश्यक पैसे व्यय होतात, तसेच अन्नाचीही नासाडी होते. त्यामुळे यापुढे विवाह समारंभात भोजन पदार्थांची संख्या १३ एवढी मर्यादित ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व समाजबांधवांनी दोन्ही हात वर करून दोन्ही ठराव संमत केले.