बालविवाह होत असल्यास प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन !
रत्नागिरी – बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. भारतात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ हा कायदा करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर २००७ पासून हा कायदा अंमलात आला. बालविवाहामुळे सामाजिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम दिसून येतो. कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण नसेल आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण नसेल अन् विवाह झाला, तर तो बालविवाह ठरतो. जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात अक्षय्य तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा होऊ शकते. बालविवाह झाल्यास नातेवाईक, बालविवाह झालेल्या जागेचे मालक, बालविवाह लावून देणारे गुरुजी यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास ग्रामसेवक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जवळचे पोलीस ठाणे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन (संपर्क क्र. १०९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर्.बी. काटकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी अजय वीर यांनी केले आहे.