सातारा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रवासी बसगाड्यांची विशेष तपासणी मोहीम !
सातारा, २० एप्रिल (वार्ता.) – येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नुकतीच रात्रीच्या वेळी विशेष बस तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विविध गुन्ह्यांखाली मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत खासगी बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली. विनाअनुमती आणि थकीत कर असणारी वाहने, बसमधून मालवाहतूक करणारी वाहने अन् अधिकचे भाडे आकारणी करणारी वाहने विशेषत्वाने मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत दोषी आढळून आलेल्या १८१ खासगी बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४ लाख ६० सहस्र ६०८ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
विनोद चव्हाण पुढे म्हणाले की, अपघात आणि अपघाती मृत्यू अल्प करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १ ते १७ एप्रिल या कालावधीमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि इतर महामार्ग येथे तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये १ सहस्र ९१३ दोषी वाहनांवर कारवाई करून २० लाख ३० सहस्त्र २४२ एवढी प्रत्यक्ष दंड आणि कर वसुली करण्यात आली. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तालुकावार नेमणूक केलेल्या विशेष पथक आणि २ नियमित पथकांच्या वतीने ज्या ठिकाणी अपघाताची तीव्रता अधिक आहे, अशा ठिकाणी विशेषतः शिरस्त्राण (हेल्मेट), सीट बेल्ट, अती वेग, निष्काळजीपणे वाहन चालवणे इत्यादी गुन्ह्यांसाठी वाहन तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात आली.
खासगी आणि इतर बस, तसेच प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृतपणे थांबा घेऊन प्रवासी चढ-उतार करतात. त्यामुळे इतर रस्ता उपयोग करणारे घटक यांना धोका उत्पन्न होतो. त्यावर विशेषत्वाने कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभी केलेली वाहने, तसेच राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या मार्गीकेमधून चालणारी वाहने यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. तसेच २ फिरत्या पथकांच्या वतीने जिल्ह्यात घडणार्या अपघातांच्या ठिकाणी तातडीने भेट देऊन त्यांना साहाय्य करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकातील अधिकारी वाहनचालकांचे समुपदेशनसुद्धा करत आहेत.