सत्ताधारी राजकीय पक्ष करदात्यांचा पैसा कुठे खर्च करतात, याकडे लक्ष ठेवा !

पंतप्रधान मोदी यांचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना (आय.ए.एस्.) आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – सत्ताधारी राजकीय पक्षावर लक्ष ठेवा. ते करदात्यांच्या पैशांचा वापर ‘स्वतःच्या पक्षासाठी करत आहे कि देशहितासाठी ?’, हे तुम्हाला पहावे लागेल. सरदार पटेल ज्या प्रशासनाला ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ म्हणत होते, ते साध्य करायचे आहे. प्रशासनाकडून चूक झाली, तर देशाचा संपूर्ण पैसा लुटला जाईल, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ व्या नागरी सेवा दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की,

१. देशाने तुमच्यावर विश्‍वास टाकून तुम्हाला पुष्कळ मोठी संधी दिली आहे. हा विश्‍वास सार्थ ठरवत काम करा. तुमच्या सेवेत तुमच्या निर्णयांचा केंद्रबिंदू केवळ देशहित असला पाहिजे.

२. आज ‘तुम्ही किती कार्यक्षम आहात ?’, याचे आव्हान नाही. ‘आव्हान उणिवांवर मात कशी करायची ?’, हे ठरवण्याचे आहे.

३. आपल्या योजना किती महान आहेत, याने काहीही फरक पडत नाही. योजना कागदावर चांगल्या दिसत असल्या, तरी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचणे निर्णायक असते. असे घडले नाही, तर आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाही.

४. २५ वर्षांपूर्वी सेवेत आलेल्या अधिकार्‍यांनी देशाला स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळापर्यंत पोचवण्यात मोठा वाटा उचलला. आता पुढील २५ वर्षे सेवेत रहाणार्‍या तरुणांची भूमिका सर्वांत मोठी असणार आहे.

अल्पसंख्यांक मंत्रालय ३० लाखांहून अधिक बोगस तरुणांना शिष्यवृत्तीचा लाभ देत होते !

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशात ४ कोटींहून अधिक गॅस कनेक्शन, बनावट रेशनकार्ड बनवण्यात आले होते. अल्पसंख्यांक मंत्रालय ३० लाखांहून अधिक बोगस तरुणांना शिष्यवृत्तीचा लाभ देत होते. आज आपण सर्वांच्या प्रयत्नाने व्यवस्था पालटली आहे. देशातील जवळपास ३ लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचले आहेत. आज हा पैसा गरिबांच्या कामाला येत आहे. त्यांचे जीवन सुलभ बनत आहे.

संपादकीय भूमिका

  • याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !