श्रीमद्भागवत कथा ही मानवी जीवनाचे कल्याण करणारी अमर कथा आहे ! – ह.भ.प. प्रकाशानंद गिरीजी महाराज
नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम येथील श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
नगर – श्रीमद्भागवत कथा सामान्य कथा नाही, तर अमर कथा आहे. श्रीमद्भागवत पुराण विधीने श्रवण, मनन आणि अनुष्ठान केल्याने जिवाला ७ दिवसांत मुक्ती प्रदान करतो. कथा, तर्पण, अर्पण आणि समर्पण या ३ गोष्टी शिकवते. अर्पण हे देशावर प्रेम करायला शिकवते. देशासाठी प्राणांची आहुती देऊन संसाराची राख रांगोळी केली त्यांच्या प्रति कृतज्ञ राहिले पाहिजे, हे शिकवते.
तर्पण आपल्याला आई-वडिलांविषयी प्रेम करायला शिकवते. ज्या आई-वडिलांनी आपल्याला हाल अपेष्टा सहन करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले, अशा आई-वडिलांविषयी कृतज्ञ रहायला शिकवते, असे निरुपण येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त श्रीमद्भागवत कथेचे पहिले पुष्प गुंफतांना देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी केले. या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कथेनिमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत पुष्पवृष्टी करून संत किसनगिरी बाबांच्या पालखीचे संत किसनगिरीनगर येथे मोठ्या आनंदाने, उत्साहाने स्वागत करण्यात आले. कथेच्या समाप्तीनंतर श्रीमद्भागवत ग्रंथाची महाआरती करण्यात आली.