ब्राह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने तळपणारे राजराजेश्वर परशुराम !
आज २२ एप्रिल २०२३ या दिवशी ‘भगवान परशुराम जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
भगवान परशुरामाने कार्तवीर्यार्जुनाचा वध करून स्वतःचे क्षात्रतेज प्रकट केले. त्या वेळी त्यांचे स्वरूप मेरुमंत्राने वर्णिले आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शाबरस्वरूप परशुराम पर्णकुटीच्या बाहेर पडत आहेत. त्यांच्या देहबोलीतून क्षात्रतेज सिद्ध होत आहे. त्यांनी वल्कले परिधान केलेली आहेत. त्यांनी डाव्या हाताची मूठ पूर्णपणे बंद केलेली नाही. महात्रिपुरासुंदरीच्या कृष्णशक्ती मंत्राचे स्थूल प्रतीक अर्धवट वाकलेल्या ३ बोटातून व्यक्त होत आहे. विशिष्ट प्रसंगामुळे त्यांना राज ऐश्वर्य प्राप्त झाले असले, तरी त्यांनी ती जीवनपद्धती स्वीकारलेली नाही. हे त्यांच्या जटाभारातून आणि त्यांच्या शांत अन् भक्तवत्सल दृष्टीतून स्पष्टपणे दिसते. संपूर्ण विश्वाचे स्वामीत्व प्राप्त झाले, तरीसुद्धा निसर्गरम्य वातावरण, पर्णशालेने आणि यज्ञवेदीने त्यांना आकर्षित केले.
राज्याचा उपभोग न घेता प्रजेला सर्व प्रकारच्या सुखसोयी त्यांनी मिळवून दिल्या. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव केरळच्या जनतेने त्यांना सुवर्ण मुकुट अर्पण करून व्यक्त केला. असे असले, तरी मुळातच विरक्त, विरागी असलेल्या परशुरामांना स्वतःचा जटामुकुटच अत्यंत प्रिय होता. म्हणून त्यांनी तो केरळच्या जनतेला परत केला; पण जनतेने मात्र तो सुवर्ण मुकुट प्रसाद म्हणून स्वीकारला आणि त्यांनी त्या मुकुटाचे पूजन आरंभले. असे हे जमदग्नी पुत्र परशुराम ‘चिरंजीव’ असून तो विष्णूचा सहावा अवतार आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच ‘अक्षय्य तृतीया’ हा राजराजेश्वर परशुराम यांचा जन्मदिवस आहे.
भगवान परशुराम यांची अवतारलीला विविधतेने नटलेली आहे. त्यांचे ऐश्वर्य आणि सामर्थ्य यांचे शब्दांत वर्णन करणे केवळ अवघडच नाही, तर अशक्य आहे. त्यांची मातृ-पितृ भक्ती, त्यांचे सहस्रार्जुनाशी झालेले युद्ध, त्यांचा दत्तावधूत यांच्याशी झालेला संवाद, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अवतारकाळात त्यांचे प्रकट होणे, तसेच कल्की अवतारासाठी योग्य मार्गदर्शन करणे, ही सर्व त्यांची वैशिष्ट्ये शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. ऋषींच्या कुळात जन्म झाला आहे. पुराणांनी त्यांचा गौरव करतांना ‘द्विजेंद्र’, ‘द्विजसत्तम’, ‘राजराजेश्वर’ अशी विशेषणे वापरली आहेत.
१. ऋचिकमहर्षींनी दिलेल्या चरूंची अदलाबदल झाल्यामुळे ‘ऋषीकुळा’त जमदग्नी आणि ‘राजकुळा’त विश्वामित्र यांचा जन्म होणे
ऋचिकमहर्षि यांनी आपल्या पत्नीला आणि आपल्या सासूला पुत्रप्राप्तीसाठी प्रत्येकीला एक स्वतंत्र चरु (शिजवलेले तांदुळ) दिला. ऋचिकमहर्षींच्या सासूबाईंना वाटले की, महर्षींनी स्वतःच्या पत्नीसाठी आपल्या चरुपेक्षा अधिक प्रभावी चरु बनवला असेल. म्हणून त्यांनी महर्षींच्या पत्नीसाठी केलेला चरु स्वतः घेतला आणि स्वतःचा चरु त्यांच्या पत्नीसाठी ठेवला. ऋचिकमहर्षींनी आपल्या सासूबाईंना ‘आदर्श राजपुत्र व्हावा’; म्हणून त्यानुरूप चरु दिला होता आणि ‘भृगुकुळाचा दीपक ठरावा’, असा चरू त्यांनी स्वतःच्या पत्नीला दिला. तथापि त्यांच्या सासूबाईंनी चरूची अदलाबदल केल्यामुळे सासूबाईंच्या पोटी ‘ऋषीकुलाला योग्य’, तर पत्नीच्या पोटी ‘राजकुलाला सुयोग्य’ असा पुत्र जन्माला आला. परिणामी राजकुलासाठी केलेल्या चरूचे तेज ऋषीकुळात, तर ऋषीकुळासाठी केलेल्या चरूचे तेज राजकुळात प्रभावित झाले. त्यामुळे राजकुळात जन्माला येऊनही विश्वामित्रांवर ब्रह्मतेजाचा पगडा एवढा राहिला की, त्यांनी ‘ब्रह्मर्षि’ पद प्राप्त केले. त्यांचा राजाचे ऐश्वर्य उपभोगण्याकडे कल राहिला नाही. सत्यवतीने आईचा चरूभक्षण केल्यामुळे तिच्या पोटी तपोनिष्ठ, शांतीसंपन्न, जितेंद्रिय आणि भृगुकुलभूषण जमदग्नीऋषींचा जन्म झाला. जमदग्नीऋषींवर क्रोधाचा परिणाम असला, तरी त्यांनी आपल्या पित्याप्रमाणे म्हणजे ऋचिकऋषींप्रमाणे क्रोधावर विजय प्राप्त करून शांती प्राप्त केली होती.
२. भगवान परशुराम यांच्यामध्ये ब्रह्मवृत्ती आणि क्षात्रतेज अस्तित्वात असणे
भगवान परशुरामांचा जन्म जमदग्नीऋषींच्या पोटी झाल्यामुळे त्यांचे शिक्षण आपल्या पित्याकडे झाले. त्यामुळे ‘ब्रह्मवृत्ती’ सुद्धा तेवढीच प्रभावीपणे त्यांच्यात वास्तव्य करू शकली. ब्रह्मवृत्ती ही जरी प्रभावीपणे त्यांच्यात होती, तरीसुद्धा राजकुळासाठी आवश्यक असलेल्या क्षात्रतेजाचे बीज त्यांच्यात तेवढ्याच प्रमाणात प्रभावीपणे अस्तित्वात होते. म्हणूनच सत्य सनातन वैदिक धर्माचे परिपालन करणार्या ऋषीमुनींचे संरक्षण आणि अन्यायाचे मर्दन करणे यांसाठी परशुरामांमधील क्षात्रतेज प्रसंगानुरूप प्रकट होत राहिले.
३. कामधेनूच्या हरणाच्या वेळी भगवान परशुरामांनी कर्तव्य बजावणे
विश्वामित्र आणि परशुराम यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या तेजांचा प्रभाव असला, तरीसुद्धा ते तेज प्रकट होण्यासाठी दोघांमध्ये काही निमित्त घडले ते कामधेनूचे ! विश्वामित्रांना वसिष्ठांच्या कामधेनूची अभिलाषा निर्माण झाली. ती कामधेनू न मिळाल्यामुळे त्यांच्यात पालट झाला. हा पालट घडतांना क्षात्र आणि ब्राह्म या दोन वृत्तींमध्ये संघर्ष घडून आला. अखेरीस विश्वामित्रांवर ब्राह्मतेजाचा प्रभाव पडला. त्यांच्या मनाने ब्राह्मवृत्तीचा स्वीकार केला. त्यामुळे ते ब्रह्मर्षि झाले. या उलट जमदग्नीऋषींनी प्रतिकार न केल्यामुळे सहस्रार्जुनाला त्यांची कामधेनु त्यांच्या इच्छेविरुद्ध नेण्याचा मोह बळावला.
विश्वामित्रांना कामधेनु प्राप्त झाली नसली, तरीसुद्धा त्रिपदा गायत्रीचे ते उद्गाते ठरले. यज्ञयागादी कर्मे आणि वेदोपनिषदांच्या पठणाने नित्य पुनित होणार्या आश्रम जीवनात परशुरामांचा जन्म झाला. तिथेच ते वाढले; पण अन्यायाने कामधेनूचे हरण करण्याचा प्रयत्न झाला, हे कळताच त्यांच्यातील क्षात्रतेज उफाळून वर आले. एखाद्या आदर्श चक्रवर्ती राजाने स्वतःचे कर्तव्य बजवावे तसे कर्तव्य परशुरामांनी बजावले.
४. भगवान परशुरामाने अन्याय करणार्या क्षत्रियांचा संहार २१ वेळा करणे
जमदग्नीऋषींच्या आदर सत्काराविषयी कृतज्ञता व्यक्त न करता उलट त्यांचीच कामधेनु चोरून नेण्याचा यशस्वी प्रयत्न कार्तवीर्याने केला. अशी वृत्ती अनेक राजांमध्ये वाढत चाललेली होती. या उन्मत्त राजांचा त्रास अनेक ऋषीगणांना होत होता. ही वृत्ती समूळ नष्ट करण्यासाठी क्षात्रतेज प्रकट करणे नितांत आवश्यक होते. त्यावाचून राजाचे कर्तव्य नेमकेपणाने कसे बजावायचे ? याचा धडा शिकवता आला नसता. राजे लोकांमध्ये कर्तव्यबुद्धीचा लोप झाला होता. त्याचा तो परिणाम सर्वांनाच भोगावा लागत होता. म्हणूनच रेणुकामातेने संपूर्ण पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याचा आदेश स्वपुत्र भार्गव (परशुराम) याला केला.
या ठिकाणी ‘क्षत्रिय संहार’ हा शब्दप्रयोग मर्यादित अर्थाने घ्यावा लागेल. याचे कारण असे की, ‘परशुरामांनी २१ वेळा क्षत्रिय संहार केला’, असा उल्लेख आपल्याला सर्वत्र आढळतो. ‘रेणुकामातेने पृथ्वी नि:क्षत्रिय कर’, असा परशुरामाला आदेश दिला असला, तरी केवळ अन्याय करणार्या क्षत्रियांचा संहार करण्यात आला. ज्या क्षत्रियांमध्ये उन्मत्तपणा बळावला होता, केवळ त्यांच्या विरोधात परशुरामांनी शस्त्र उगारले. कर्तव्यपरायण राजांशी त्यांचे चांगले संबंध होते. अशा क्षत्रिय राजांना परशुरामांनी हात सुद्धा लावला नाही. त्यामुळे परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली, यातील ‘नि:क्षत्रिय’ हा शब्दप्रयोग मर्यादित अर्थाने घेणे सयुक्तिक ठरेल. थोडक्यात एकापेक्षा अधिक वेळा असा संग्राम झाला, एवढाच अर्थ यातून लागू शकतो.
सहस्त्रार्जुन, त्याचे संपूर्ण कुळ आणि त्यांची बाजू घेणारे सर्व राजे यांचा नि:पात परशुरामांनी केला. अश्वमेध यज्ञ करून चक्रवर्तीपद प्रस्थापित केले; पण प्राप्त झालेले चक्रवर्तीपद हे प्रसंगामुळे प्राप्त झाले होते. उद्देश पूर्ण होताच त्यांनी आपल्या चक्रवर्ती पदासह पृथ्वी कश्यपऋषींना दान दिली.
५. परशुरामाने सत्प्रवृत्त क्षत्रियांच्याच हातात पृथ्वी देण्यावरून केली जाणारी टीका आणि तिचे खंडण
जमदग्नीऋषींनी सूर्याला सुद्धा शरण आणले होते. क्रोधावर विजय संपादन केल्यावर त्यांच्यात प्रतिकारशक्ती अजिबात नव्हती, असे म्हणता येणार नाही. तसेच महापराक्रमी राजे-महाराजे यांचा संपूर्ण पराभव करून अथवा अनेकांना कंठस्नान घालून अजिंक्यपद प्राप्त करून घेतल्यावर सर्वस्वाचे दान देणार्या परशुरामांना समाजात स्थान नव्हते. ‘त्यांचा पराभव झाला होता’, असा विपरीत निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही.
दान स्वीकारल्यावर ते देणार्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यातील कश्यपऋषींचा कठोरपणा किंवा दान म्हणून प्राप्त झालेल्या पृथ्वीच्या स्वामित्वाचे क्षत्रिय राजात त्यांनी केलेले विभाजन यावरून परशुरामांना समाजात स्थान राहिले नव्हते, असा अर्थ काढण्याची खटपट केली जाते. वास्तविक पहाता सर्वस्वाचे दान केल्यावर दात्याने त्या वस्तूचा उपभोग घ्यायचा नाही, याची जाणीव त्यालाच करून देणे कितपत योग्य आहे ? परशुरामांप्रमाणे कश्यपऋषींनाही राज्य करायचे नव्हते. कर्तव्यनिष्ठ क्षत्रियांचेच ते कार्य होय. म्हणूनच सत्प्रवृत्त क्षत्रियांच्याच हातात ते दायित्व सोपवून देणे कश्यपऋषींना योग्य वाटले.
६. ऋचिकऋषींनी बनवलेले चरू जसेच्या तसे सेवन केले असता होऊ शकणारे परिणाम
ऋचिकऋषींनी चरू बनवतांना आदर्श ऋषिकुमार आणि आदर्श राजपुत्र कसे असावेत ? याचा विचार करून ते तेज त्या चरूमध्ये अंतर्भूत केले होते. त्या चरूंची अदलाबदल झाली नसती, तर ऋषिकुमार सर्वस्वी ब्रह्मतेजाने युक्त झाला असता. ही गोष्ट कौतुकास्पदच आहे. ज्या वेद उपनिषदांचे संगोपन त्याला करायचे होते त्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना, संरक्षण वृत्ती त्याच्यात विकसित होणे आवश्यक आहे. अन्यथा विपरीत काळ आल्यानंतर संगोपन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पत्नीचा चरू ब्रह्मतेज प्रधान असला, तरी त्यात क्षात्रतेजाचा अविष्कार असला पाहिजे. त्याचबरोबर आदर्श चक्रवर्ती राजाचे प्रमुख कार्य अन्यायाचा प्रतिकार आणि प्रजेचे संरक्षण करणे हे आहे. प्रतिकार म्हटला की, क्षात्रतेज प्रधानता ओघाने आली. तसेच प्रजेचे संगोपन म्हटले की, सत्त्वगुणांची आवश्यकता आली. म्हणूनच क्षात्रतेजाने प्रधान चरू त्यांना ब्रह्मतेजाने युक्त करावा लागला असला पाहिजे.
मुनीवरांच्या मूळ उद्देशाप्रमाणे चरूचे सेवन झाले असते, तर परशुराम एक आदर्श ऋषिकुमार झाले असते. अध्ययन आणि अध्यापनात ख्यातनाम झाले असते. काही ऋचांचे ‘द्रष्टे’ म्हणून ओळखले गेले असते. मर्यादित स्वरूपात त्यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष केला असता; पण ते कार्य मर्यादित स्वरूपात घडले असते. विश्वामित्रही पराक्रमी आणि प्रभावी राजे झाले असते. त्यांना ‘चक्रवर्ती’ पद प्राप्त झाले असते. दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ म्हणून ओळखले गेले असते; पण समाजात जी शिथीलता निर्माण झाली होती, जी अनिष्ट प्रवृत्ती बळावली होती, त्याचा प्रतिकार करून वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी दोघांच्याही हातून घडली नसती. विश्वामित्र आणि परशुराम यांच्या हातून जे कार्य घडले, ते कार्य चरूंची अदलाबदल झाल्यामुळे जे तेज त्यांच्यात निर्माण झाले त्यामुळे घडले. असे आपण म्हणू शकतो.
७. परशुराम आणि विश्वामित्र यांनी साकारलेली एकाच विद्येची दोन स्वरूपे
आध्यात्मिकदृष्टीने आपण या चरूंमधील शक्तीकडे पाहिले, तर एका वेगळ्याच घटनेवर प्रकाश पडतो. विश्वामित्रऋषि ‘त्रिपदा गायत्री’चे द्रष्टे आहेत, तर परशुरामांनी आपले शिष्य हरितायन यांच्याकडून ‘श्री विद्या’ भूतलावर प्रकट करवली. श्री विद्या केवळ भाग्यवान शिष्याला गुरूंच्या मुखातून अवगत होते. त्रिपदा गायत्री ही उपासनेचे मूळरूप आहे. एकाच विद्येची दोन स्वरूपे परशुराम आणि विश्वामित्र या दोघांनी भूतलावर निर्माण केली. त्यामुळे या दोन्ही चरूंमध्ये आदिमायेच्या उपासनेचे बीज असले पाहिजे. परशुरामाने श्री विद्येची उपासना भूतलावर अविरतपणे चालू ठेवण्याचे चिरंजीव कार्य हाती घेतले. त्याच उपासनेचे एक स्थूल स्वरूप, एक सुलभ साधना विश्वामित्रांनी मानवाच्या कल्याणासाठी उपलब्ध करून दिली. कामधेनु ही एक शक्ती आहे. तिला केवळ ४ पायांची गाय समजणे योग्य ठरणार नाही. हे यानिमित्ताने सुचित करणे उचित वाटते.
८. भगवान परशुराम यांचा ‘राजराजेश्वर’ म्हणून उल्लेख करण्यामागील कार्यकारणभाव
परशुराम राजे आहेत आणि राजांमध्ये ते श्रेष्ठ आहेत. ते राजे असूनही ईश्वर सुद्धा आहेत, अशी निरनिराळी अंगे आपल्या दृष्टीसमोर सहज येतात. त्यामुळे त्यांचा राजा या अर्थाने उल्लेख का करण्यात आला आहे ? याचा शोध घ्यावा लागेल.
कौरव आणि पांडव यांच्यात झालेल्या युद्धात अभिमन्यू मारला गेल्यावर युधिष्ठराला अत्यंत दुःख झाले. तो विलाप करू लागला. त्याला विजय आणि राज्य नकोसे झाले. त्याला त्यानंतर युद्ध करावेसे वाटले नाही. अमरत्व, स्वर्ग यांविषयीही पांडवांच्या मनात आवड राहिली नाही. त्यांची ही विषण्ण मनस्थिती पाहून व्यासमुनी तिथे प्रकट झाले आणि त्यांनी युधिष्ठिराचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी १६ राजांचे आख्यान सांगितले.
अश्वमेध सहस्र किंवा राजसूय शतयज्ञ करणारा संजय, ज्याच्या अश्वमेधात देशादेशातून राजेलोक उपस्थित होते आणि वेद पुराणांनी ज्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे असा पौरव, सर्वमूर्धाभिषिक्तांना सुद्धा मान्य असणारा शिबिराजा, सारी प्रजा स्वर्गाला पाठवणारा श्रीराम, सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी गंगावतारण घडवून आणणारा भगीरथ, ‘माझे भक्षण कर; पण गोमातेला वाचव’, असे म्हणणारा दिलीप, प्रत्यक्ष देवेंद्राकडून अमृतपानाचे भाग्य मिळवलेला मांधातृ, स्वतःच्या पुत्राकडून तारुण्य प्राप्त करून घेणारा ययाती, महान धार्मिक अंबरीश, यज्ञात अनंत राशी अन्न किंवा हिरण्यदान करणारा शशबिंदू, तिन्ही लोकांत दानशूर म्हणून प्रसिद्ध पावलेला गयराजा, शत्रूंना देवत्वापर्यंत नेणारा रन्तिदेव, सिंहाच्या छाव्यांना कानाने पकडून आणणारा भरत राजा, वेळ येताच इंद्रावरही दया करणारा पृथु हे सर्व राजे महान पराक्रम होते. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्यज्ञ या चारहीच्या चारी ज्यांना प्राप्त झाले होते आणि विचार करता सौभद्रापेक्षा ते कितीतरी श्रेष्ठ होते. अशा सर्व राज्यांना अखेरीस मृत्यू आला. या १५ राजांचे वर्णन केल्यानंतर सर्वात अखेरीस स्वतंत्रपणे १६ व्या राजाचे वर्णन करण्यात आले आहे. तो राजा म्हणजे राजराजेश्वर परशुराम होय.
‘संपूर्ण भूतलाला सुखी करण्यासाठी अविश्रांत श्रम करणारे, अन्यायाचे परिमार्जन करून अष्ट-दशद्वीपांनी वेष्टीत झालेली वसुंधरा स्वामित्वाखाली आणणारे आणि लगेच तिचे दान करणारे महाप्रतापशाली भृगुकुळात जन्माला येऊन त्यांची कीर्ती वाढवणारे परशुराम हेही मन्वंतराच्या वेळी पार्थिव देहाचे विसर्जन करणार आहेत’, असे व्यासांनी युधिष्ठिराला सांगितले.
सप्तचिरंजीवांमध्ये भार्गवरामाची गणना होते. ते सुद्धा मन्वंतरानंतर सप्तऋषी मंडळात विराजमान होणार आहेत; म्हणून भविष्यकाळाची योजना लक्षात येऊ शकते. युधिष्ठिराने विलाप करणे सोडावे; म्हणून १६ राजांचे स्मरण करून देण्यासाठी संपूर्ण कथा सांगितली. त्या १६ राजांमध्ये भार्गवरामांचा उल्लेख करण्यात आला आहे. १५ नृपालांची (राजांची) विविध गुणवैशिष्ट्ये आपल्याला आकर्षित करतात. भृगुकुलाची कीर्ती सर्वत्र पसरवणारे जमदग्नीपुत्र भार्गवरामांच्या ठायी असणारे प्रत्येक गुण हे त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करते. म्हणूनच त्यांना ‘राजराजेश्वर’ हे विशेषण शोभून दिसते.
९. भगवान परशुरामांची अन्य नावे
श्रीविष्णूच्या श्रीराम अवतारात लक्ष्मीने सीतामाईंचे रूप घेतले आहे. परशुरामांच्या अवतारात लक्ष्मीने धरणीचे स्वरूप घेतले. म्हणून परशुरामांना ‘धरणीपती’ असेही म्हटले जाते. तसेच ‘सप्तद्वीपमहिपती’ या नावाने सुद्धा परशुरामांना संबोधले जाते. महाविष्णूंचा हा ब्रह्मचारी अवतार आहे. त्यामुळे लक्ष्मीला या अवतारात पार्थिव देहाने प्रकट होता आले नाही. म्हणून लक्ष्मीमातेने धरणीचे रूप धारण केले.
१०. भगवान परशुराम आणि पितामह भीष्म यांच्या युद्धाच्या मागच्या दैवीसंकेताचे विश्लेषण
महाभारतामध्ये भगवान परशुराम आणि पितामह भीष्म यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन आपल्याला वाचायला मिळते. या गुरु-शिष्यांच्या संग्रामाचे विश्लेषण श्रीमद्भगवत्पाद मध्वाचार्य यांनी त्यांच्या प्रासादिक ग्रंथात केले आहे. या ग्रंथात त्यांनी भगवान परशुराम आणि पितामह भीष्म यांच्या युद्धाच्या मागच्या दैवीसंकेताचे विश्लेषण केले आहे. ते असे..
‘‘भीष्मांबरोबर युद्ध करण्यामागचा भगवान परशुरामांचा हेतू त्यांना यश प्राप्त करून देणे, हा होता. भगवान परशुरामांकडे विविध प्रकारच्या शक्ती असूनही त्यांनी भीष्मांचा वध केला नाही. त्याचबरोबर अंबेचा स्वीकार करण्यासाठी पितामह भीष्मांना त्यांनी भाग पाडले नाही. भगवान परशुराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यांना आपल्या शिष्यावर नियंत्रण सहजपणे ठेवता आले असते; पण त्यांनी तसे केले नाही. ‘आपल्या शिष्याने आपल्यावर प्रहार केले आणि त्यामुळे आपण मुग्ध झालो, वेदनांनी आर्त झालो’, असे परशुरामांनी म्हटले असले, तरी तशी वस्तुस्थिती नव्हती. पुराणांमध्ये परशुरामांचा सर्वत्र विजय झाल्याचे उच्चरवाने सांगण्यात आले आहे. एकीकडे भीष्मांना त्यांनी यश प्रदान केले आणि त्याच वेळी वज्राच्या पिंजर्याप्रमाणे शरणागताचे रक्षण करणार्या परशुरामांनी भर्तृत्वेषामुळे उत्पन्न झालेल्या पापामधून अंबेला मुक्त केले.
शंकराची तपश्चर्या करून अंबा शिखंडी झाली आणि भीष्मवधाची इच्छा तिने पूर्ण केली. अनेक जन्म भोगूनही ज्याचा कलंक धुतला जात नाही, असे पती वधाचे पाप तिच्या हातून घडणार होते, त्यापासून परशुरामांनी तिचा बचाव केला आणि तिला मुक्त केले. भगवान शंकराने अंबेला ‘तू भीष्मांचा वध करू शकशील’, असा दिलेला वर खरा होणे आवश्यक होते. ‘कधीही न कोमेजणार्या कमल पुष्पांची माला अंबेने सिद्ध केली होती. त्या मालेचा जो स्वीकार करेल, तोच भीष्मांना मारेल’, हे सांगायला तिने आरंभ केला. भीष्मांच्या ठायी असलेल्या अतुलनीय सामर्थ्यामुळे त्या मालेचा स्वीकार करण्यासाठी त्या वेळेचा कोणताही वीर पुरुष धजावला नाही. त्यामुळे तिला द्रुपदराजाच्या दारी तो हार टाकून द्यावा लागला. त्यानंतर ती योग साधनेसाठी निघून गेली.
अंबेची या जन्मातील इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. तिने शिखंडीच्या रूपात जन्म घेतला. द्रुपदराजाने द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी द्रौपदीच्या हातात अंबाने सिद्ध केलेली आणि न कोमेजणार्या कमल पुष्पांची माला दिली. ती माला विवाह प्रसंगी द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यात घातली. याचा अर्थ भीष्मांचा वध अर्जुनाच्या हातून होणार होता. त्याच वेळी अर्जुनालाही शिखंडीचे साहाय्य लाभणार होते. अशा प्रकारे अंबेला मिळालेले वरदान सत्यात उतरले.’’
भगवान परशुराम यांचा पराभव करू शकणारा त्या वेळी भूतलावर कुणीही नव्हता. तरीही भीष्मांशी युद्ध करताना त्यांनी ‘भीष्मा तू जिंकलास’, असे उद्गार काढले.
११. भगवान परशुरामांनी केलेले अतुलनीय दैवीकार्य
भगवान परशुरामांनी राजनीती अवगत केली होती. त्या राजनीतीचा उपयोग त्यांनी समाजाला वळण लावण्यासाठी केला. त्यांनी प्राप्त केलेल्या धनुर्विद्येचा उपयोग अन्याय नष्ट करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी केला. स्वपराक्रमावर पृथ्वीचे ऐश्वर्य संपादन करून ते कश्यपमुनींच्या चरणी अर्पण केले. वैदिक संस्कृतीची प्रस्थापना करण्यासाठी अवधूत दत्तात्रयांकडून श्रीविद्येचे सुलभीकरण करवून घेतले. म्हणूनच विविध क्षेत्रात कार्य करून मानवाच्या कल्याणासाठी ब्राह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने तळपणार्या परशुरामांचा ‘राजराजेश्वर’ म्हणून गौरव करण्यात येतो. अशा या विष्णूच्या ६ व्या अवताराला कोटी कोटी प्रणाम !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१४.४.२०२३)