सामाजिक माध्यमांवर हत्यारांची छायाचित्रे ठेवल्याने एकास अटक !
सातारा, २१ एप्रिल (वार्ता.) – सामाजिक माध्यमांवर तलवार, कोयता यांसारख्या हत्यारांची छायाचित्रे ठेवल्याने, तसेच त्यांचे ‘व्हिडिओ’ प्रसारीत केल्याने एकास अटक करण्यात आली आहे. माण तालुक्यातील भांडवली येथील प्रतीक नामदार असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
सामाजिक माध्यमांवर ही छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलिसांनी प्रतीकवर लक्ष केंद्रीत केले. तातडीने हालचाली करत पोलिसांनी घरावर धाड टाकत घरातून तलवारी, कोयते, चॉपर कह्यात घेतले. याविषयी दहिवडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४ आणि २५ प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.