इंधन बचत आणि इंधन संवर्धन यांसाठी २४ एप्रिल ते ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना डावीकडून नानासाहेब सुगांवकर, तसेच अन्य अधिकारी

कोल्हापूर, २१ एप्रिल (वार्ता.) – इंधन बचत आणि इंधन संवर्धन यांविषयी वाहनधारक, तसेच नागरिक यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत इंधन पंप, महामार्ग यांठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे महत्त्व पटवून दिले जाईल, अशी माहिती ‘भारत पेट्रोलियम’चे विक्री व्यवस्थापक नानासाहेब सुगांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘भारत पेट्रोलियम’चे साहाय्यक व्यवस्थापक आकाश गुंडे आणि तुषार चव्हाण उपस्थित होते.

१. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम-नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांनी पुढाकार घेत जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ८०० उपक्रम या अंतर्गत घेण्यात येणार आहेत. वर्ष २०११ पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

२. विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद स्पर्धा, इंधन कार्यक्षम चालक स्पर्धा, लेख लेखन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भित्तीचित्र स्पर्धा होणार आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षकांना त्यांच्या योगदानाविषयी सत्कार करण्यात येईल.

 एकाही डिझेल-पेट्रोल पंपावर भेसळ होत नाही ! – नानासाहेब सुगांवकर

शहरात काही पेट्रोलपंपांवर भेसळीच्या तक्रारी येतात, त्या संदर्भात भारत पेट्रोलियम काय करत आहे ? अशी विचारणा केल्यावर ‘भारत पेट्रोलियम’चे विक्री व्यवस्थापक नानासाहेब सुगांवकर म्हणाले, ‘‘आताच्या काळात एकाही डिझेल-पेट्रोल पंपावर भेसळ होत नाही. आमची व्यवस्था आता अत्याधुनिक असून मुंबईत बसून कोल्हापूर येथील ‘स्टेट्स’ कळू शकतो. इंधन निघाल्यापासून ते पंपापर्यंत पोचेपर्यंत प्रत्येक व्यवस्थेवर ‘संगणकीकृत पडताळणी’ होते. प्रत्येक सूत्राची अद्ययावत् माहिती आमच्याकडे असते. त्यामुळे आता भेसळ शक्य नाही. बहुतांश इंधन पंपांवर आता विनामूल्य हवा देण्याच्या सूचनाही आम्ही दिल्या आहेत.’’