ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले !
|
रत्नागिरी – सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर येथे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले. सरकारने लोटे येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळे’ला उर्वरित अनुदान द्यावे, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवावा, या मागण्यांसाठी ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी खेड तालुक्यातील लोटे गोशाळेजवळ १० एप्रिलला उपोषण आरंभले होते. या उपोषणासंदर्भात सरकारच्या प्रतिनिधींनी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख पदाधिकार्यांशी केलेल्या चर्चेनंतर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.
सौजन्य : ABP MAJHA
.. अन्यथा पुन्हा आंदोलन ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, गोशाळा महासंघाचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, भाजपचे शेखर मुंदडा, अक्षय महाराज भोसले यांच्या मध्यस्थीने राज्याचे पशूसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधून चर्चा करण्यात आली. त्या वेळी ‘गोशाळेसंदर्भातील मागण्यांचा विचार करण्यात येईल’, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. पुढील २५ दिवसांत सरकारने आश्वासनाची पूर्तता न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाकडून प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी दिली.