पोलिसांची कृती राजकीय दबावाखाली ! – हनुमंत परब यांचा आरोप

‘गोवंश रक्षा अभियान’चे हनुमंत परब यांचा पोलिसांच्या गुन्हेगारांच्या सूचीत समावेश

श्री. हनुमंत परब

पणजी, २० एप्रिल (वार्ता.) – राज्यात चालू असलेल्या ‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी ‘गोवंश रक्षा अभियान’चे अध्यक्ष, वाळपई येथील जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष, पिसुर्ले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, तसेच गोव्यात गोवंश रक्षणासाठी कृतीशील असलेले श्री. हनुमंत परब यांचे नाव गुन्हेगार सूचीत समाविष्ट केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यांना जी-२० बैठकीच्या कालावधीत प्रतिदिन पोलीस ठाण्यात उपस्थिती लावण्यास सांगितले आहे. राजकीय दबावाखाली पोलिसांनी ही कृती केल्याचा आरोप श्री. हनुमंत परब यांनी केला आहे. श्री. हनुमंत परब यांनी पोलीस ठाण्यात उपस्थिती लावून पोलिसांच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

सौजन्य : OHeraldo Goa

११ मार्च २०२२ या दिवशी पिसुर्ले येथे ट्रकमधून खनिज नेतांना ते रस्त्यावर सांडत असल्याने शेतकर्‍यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. या वेळी श्री. हनुमंत परब यांना पोलीस ठाण्यात नेऊन पोलीस अधिकार्‍यांनी मारहाण केली होती. या अन्यायाच्या विरोधात श्री. हनुमंत परब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. सध्या हे प्रकरण राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे प्रविष्ट झालेले आहे.

‘मला त्रास देणे’ हा यामागील हेतू ! – हनुमंत परब

पोलिसांच्या गुन्हेगार सूचीत नाव असल्याच्या प्रकरणी माहिती देतांना श्री. हनुमंत परब म्हणाले, ‘‘गोवा पोलिसांनी मी गुन्हेगार असल्याची एक धारिका सिद्ध केली आहे. खाणींमुळे होणार्‍या दुष्परिणामांपासून जनहित जपण्याचे माझे प्रयत्न असल्याने ‘मला त्रास देणे’ हा यामागील हेतू आहे.’’

पोलिसांच्या प्रयत्नांना जनतेने विरोध केला पाहिजे ! – क्लॉड आल्वारिस, ‘गोवा फाऊंडेशन’

श्री. हनुमंत परब हे गुन्हेगार नाहीत किंवा त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. पोलिसांनी त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी दोनदा विचार करायला पाहिजे होता. लोकशाहीत असे प्रकार स्वीकारार्ह नाहीत. श्री. हनुमंत परब यांच्या प्रतिमेला धक्का पोचवणार्‍या पोलिसांच्या प्रयत्नांना जनतेने विरोध केला पाहिजे.

संपादकीय भूमिका

भाजपच्या राज्यात गोरक्षक किंवा पर्यावरण रक्षक यांचा गुन्हेगारांच्या सूचीत समावेश अपेक्षित नाही !