देहली येथील ‘व्ही.आर्.एल्. लॉजिस्टिक्स’ आस्थापनाचे श्री. वर्धान शर्मा यांना सनातन-निर्मित सात्त्विक उदबत्तीविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यामुळे त्यांनी धर्मकार्यात केलेले साहाय्य !

१. श्री. वर्धान शर्मा यांनी प्रतिदिन सनातन-निर्मित उदबत्तीच्या पुड्यातील उदबत्त्या लावूनही त्या न संपणे

श्री. वर्धान शर्मा

‘अनुमाने दीड वर्षापूर्वी मी ‘व्ही.आर्.एल्. लॉजिस्टिक्स लिमिटेड (ट्रकने साहित्य वाहून नेणारे आस्थापन)’ या आस्थापनाच्या श्री. वर्धान शर्मा यांना सनातन-निर्मित उदबत्तीचा एक मोठा पुडा दिला होता. प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी ते त्यांच्या घरातील प्रत्येक खोलीत २ उदबत्त्या, याप्रमाणे ४ खोल्यांमध्ये एकूण १६ उदबत्त्या लावतात. ते मला म्हणाले, ‘‘प्रतिदिन एवढ्या उदबत्त्या लावूनही त्या पुड्यात पूर्वी जेवढ्या उदबत्त्या होत्या, तेवढ्याच आताही आहेत. आम्ही त्या पुड्यातून जेवढ्या उदबत्त्या काढतो, तेवढ्या त्या पुन्हा आपोआप वाढतात.’’

२. श्री. वर्धान शर्मा यांच्या नातेवाइकांनी वरील अनुभूती स्वतः अनुभवल्यावर त्यांना आश्चर्य वाटणे आणि त्यांची सनातन संस्थेवरील श्रद्धा वाढणे

श्री. अशोक दहातोंडे

ते म्हणाले, ‘‘सनातनच्या उदबत्तीविषयी आलेली अनुभूती मी माझ्या नातेवाइकांना सांगितली. त्यावर त्यांचा विश्वास बसेना; म्हणून ते स्वतः येऊन पाहून गेले. त्यांनाही फार आश्चर्य वाटले. नंतर त्यांचीही सनातन संस्था आणि संस्थेचे कार्य यांवरील श्रद्धा वाढली. पूर्वी मी पेठेतून उदबत्त्या आणत होतो. उदबत्त्यांचा तो पुडा एका आठवड्यातच संपायचा; पण सनातन-निर्मित उदबत्ती संपतच नाही.’’

३. श्री. वर्धान शर्मा यांच्या शेजार्‍यांना सनातनच्या उदबत्तीचा सुगंध आवडणे

श्री. वर्धान शर्मा घरात सनातन-निर्मित उदबत्त्या लावतात. तेव्हा त्याचा सुगंध शेजारी रहाणार्‍यांना येतो. श्री. वर्धान मला म्हणाले, ‘‘माझे शेजारी मला विचारतात, ‘‘कुठली उदबत्ती लावता ? छान सुगंध येतो.’’ तेव्हा मी त्यांना सनातनच्या उदबत्तीविषयी सांगतो.’’

४. श्री. शर्मा यांना सनातन-निर्मित उदबत्तीत दैवी गुण असल्याचे जाणवणे

श्री. वर्धान शर्मा यांना ‘बाहेर मिळणार्‍या उदबत्त्यांपेक्षा सनातन-निर्मित उदबत्तीत दैवी गुण आहेत’, असे वाटते. ते मला म्हणाले, ‘‘या उदबत्यांमध्ये लक्ष्मीचा वास आहे’, असे मला वाटते.’’

५. ‘सनातन-निर्मित उदबत्ती वापरायला आणि सनातन संस्थेला अर्पण द्यायला आरंभ केल्यापासून माझ्या व्यवसायात वृद्धी होत आहे’, असे श्री. शर्मा यांनी सांगणे

मी ‘पार्सल’ आणायला ‘व्ही.आर्.एल्.’ आस्थापनात गेल्यावर प्रत्येक वेळी श्री. वर्धान शर्मा माझ्याकडे सनातन संस्थेसाठी अर्पण देतात. ते मला म्हणतात, ‘‘तुम्ही भेटल्यावर मला फार आनंद होतो. मी घरी सनातनची उदबत्ती लावायला आणि सनातन संस्थेला अर्पण द्यायला आरंभ केल्यापासून माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी होत आहे.’’

६. सेवाकेंद्रातील कचरा टाकण्यासाठी गाडीत ठेवलेला असतांनाही श्री. शर्मा यांना गाडीतून सुगंध येणे आणि देवाने दिलेली ही आध्यात्मिक अनुभूती असल्याचे सांगून साधकाने त्यांना साधना करण्यास सुचवणे

सप्टेंबर २०२२ मध्ये मी ‘व्ही.आर्.एल्.’ आस्थापनातून ‘पार्सल’ आणायला जातांना सेवाकेंद्रातील कचरा बाहेर टाकण्यासाठी गाडीत ठेवला होता. त्या कचर्‍यामुळे गाडीत दुर्गंध येत होता. माझ्या समवेत आलेल्या साधकांनाही दुर्गंध येत होता. ‘व्ही.आर्.एल्.’ आस्थापनातील ‘पार्सल’ साहित्य गाडीत भरून झाल्यावर श्री. वर्धान शर्माजी नेहमीप्रमाणे माझ्याशी बोलायला आणि अर्पण देण्यासाठी गाडीजवळ आले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मला गाडीतून यज्ञासारखा सुगंध येत आहे.’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘सेवाकेंद्रात प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्र केले जाते. त्यामुळे तुम्हाला गाडीजवळ आल्यावर त्याचा सुगंध जाणवला. देवाने तुम्हाला दिलेली ही आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती आहे. आता तुम्ही नियमित पुढील साधना करायला हवी.’’ त्यानंतर मी त्यांना नामस्मरण आणि त्याचे महत्त्व सांगितले. ‘त्यांना नियमित सत्संग मिळावा’, यासाठी मी त्यांना ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण आणि नामसत्संग यांच्या ‘लिंक’ पाठवू लागलो.

७. सनातन संस्थेवरील विश्वासामुळे ‘व्ही.आर्.एल्.’ आस्थापनाने देहली सेवाकेंद्राच्या नावे आलेली ‘पार्सल्स’ त्यांच्या वाहनातून सेवाकेंद्रात पोचती करणे

एकदा सेवाकेंद्रात साधकसंख्या न्यून असल्याने ‘व्ही.आर्.एल्.’ आस्थापनातून ‘पार्सल’ आणण्यास अडचण आली. तेव्हा मी श्री. वर्धान शर्मा यांना विनंती केली, ‘‘सनातनच्या देहली सेवाकेंद्राच्या नावे आलेली ‘पार्सल्स’ तुमच्या वाहनातून सेवाकेंद्रात पाठवू शकाल का ?’’ तेव्हा त्यांनी स्वतः सर्व खोकी टेम्पोत भरून सेवाकेंद्रात पाठवली. प्रत्यक्षात कुठलेही ‘ट्रान्सपोर्ट’ आस्थापन कागदपत्रे दाखवून पैसे भरल्याविना त्यांच्या गोदामातून ‘पार्सल्स’ बाहेर काढत नाहीत. केवळ सनातन संस्थेवरील विश्वासामुळे त्यांनी ‘पार्सल्स’ पाठवली.’

– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, देहली सेवाकेंद्र (१५.२.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक