जलतरण तलावात महिलांना पोहण्यासाठी योग्य वेळ मिळावी ! – ‘व्हिजन इचलकरंजी’चे निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीचे २ मोठे जलतरण तलाव आहेत. एक भगतसिंग बागेजवळ असून दुसरा घोरपडे नाट्यगृहाजवळ आहे. भगतसिंग बागेजवळील जलतरण तलाव हा बंद स्थितीत आहे. त्यामुळे सर्व भार नाट्यगृहाजवळील जलतरण तलावावर असून या तलावात पोहण्यासाठी महिलांना दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ आहे. ही वेळ महिलांना कडक उन्हात असून पोहण्यासाठी योग्य नाही. तरी जलतरण तलावात महिलांना पोहण्यासाठी योग्य वेळ मिळावी, या मागणीचे निवेदन ‘व्हिजन इचलकरंजी’च्या वतीने इचलकरंजी पालिका आयुक्तांना देण्यात आले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलांना सकाळी ७ किंवा ८ वाजल्यानंतर पोहण्याची वेळ मिळावी, तसेच सायंकाळी ६ वाजेपर्यंत महिलांना पोहण्याची वेळ वाढवण्याची विनंती आम्ही करत आहोत. भगतसिंग बागेजवळील जुना जलतरण तलाव दुरुस्ती करून या दोन्ही जलतरण तलावांपैकी एक जलतरण तलाव हा कायमस्वरूपी महिलांसाठी आणि एक जलतरण तलाव पुरुषांसाठी असे करावे.
खवरे भाजी मार्केट येथे स्वच्छता करावी !
‘व्हिजन इचलकरंजी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने खवरे मार्केट येथे १५० वृक्ष लावले आहेत. या झाडांची सर्व निगा आमचे सदस्य राखतात; परंतु खवरे मार्केटमधील अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य, कचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. तिचा परिणाम आरोग्यावर होतो. तरी खवरे भाजी मार्केट येथे स्वच्छता राखावी, या मागणीचे निवेदनही दिले. या निवेदनावर अध्यक्ष कौशिक मराठे, कोषाध्यक्ष अशोक पाटणी, महावीर भंसाळी, अमित कुंभार, राजेश व्यास यांची स्वाक्षरी आहे.