‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यातील भाविकांच्या मृत्यूची चौकशी होणार !
मुंबई – खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर १६ एप्रिल या दिवशी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याला जमलेल्या लाखो भाविकांमधील १४ जणांचा मृत्यू झाला. भाविकांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे सांगितले जात आहे; मात्र विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाविकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? याची वस्तूस्थिती पडताळण्यासाठी राज्य सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. एका मासामध्ये ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करतांना कोणती दक्षता घ्यायला हवी ? याविषयीच्या शिफारसीही समिती सरकारला सादर करणार आहे.