तक्रार करूनही धमक्या मिळत असल्याने पोलीस ठाण्यासमोरच पेटवून घेतले !
नांदेड येथील प्रकार !
नांदेड – प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही आरोपी पुन्हा धमक्या देत असल्याने मासेमारी करणारे विकास कायपलवाड (वय ४३ वर्षे) यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यासमोरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १६ एप्रिल या दिवशी सायंकाळी घडली. या घटनेत विकास कायपलवाड ६० टक्के भाजले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.
विकास कायपलवाड हे मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात; पण गावातील काही जणांनी त्यांना मासेमारी करण्यास रोखले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायपलवाड यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाईही केली; परंतु त्यानंतरही कायपलवाड यांना गावातील लोक त्रास देत होते. त्यांना धमक्या देत होते. त्यामुळे हताश झालेल्या कायपलवाड यांनी पोलीस ठाण्याच्या समोरच स्वत:ला पेटवून घेतले. या वेळी ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवली. त्यामुळे वेळीच अनर्थ टळला.