छत्रपती संभाजीनगर येथे जिवंत व्यक्तीला मृत दाखवत रोखले वेतन !
महापालिकेचा हलगर्जीपणा !
छत्रपती संभाजीनगर – कर्तव्यावर कार्यरत असलेल्या महापालिकेतील एका कर्मचार्याला मृत झाल्याचे समजून त्याचे वेतन रोखण्यात आले. समवेत काम करणार्या इतर कर्मचार्यांचे वेतन बँकेत जमा झाले; पण आपले वेतन जमा न झाल्याने या कर्मचार्याने संबंधित विभागात विचारणा केल्यावर त्याला धक्काच बसला; कारण मृत पावलेल्या इतर कर्मचार्याच्या नावाऐवजी त्याच्या नावासमोर चुकीने फुली मारण्यात आली होती. त्यामुळे मृत झाल्याचे समजून त्याचे वेतन रोखण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील एका कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून वेतनाची सूची लेखा विभागाकडे पाठवतांना मृत कर्मचार्यांच्या नावापुढे फुली मारली जाते; पण काही दिवसांपूर्वी मृत झालेल्या कर्मचार्याच्या नावावर फुली मारण्याऐवजी दुसर्याच कर्मचार्याच्या नावापुढे शिक्षण विभागाच्या लिपिकाने फुली मारली. त्यामुळे चुकीची फुली मारलेल्या संबंधित कर्मचार्याचे मार्च मासाचे वेतन लेखा विभागाने अधिकोषात जमा केले नाही. (या प्रकरणात लिपिकाची चूक असल्याने त्या लिपिकावर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) त्यामुळे या कर्मचार्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वत:च्या हक्काच्या वेतनासाठी या कर्मचार्याला वेगवेगळ्या कार्यालयांत हेलपाटे घालावे लागत आहेत.