श्री महालक्ष्मीदेवीचे तारक रूप अनुभवणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर!
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचे तारक रूप आणि तत्त्व अनुभवणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !
‘१५.३.२०२३ या दिवशी आम्ही आमची कुलदेवी कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी हिचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला आलेली अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. मंदिराबाहेर असतांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘आम्ही मंदिराच्या बाहेर असतांना श्री महालक्ष्मीदेवी मला तिच्या तत्त्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी बोलावत आहे’, असे मला जाणवत होते.
आ. आम्ही मंदिरात जातांना माझ्याकडून देवीला आपोआप प्रार्थना होत होती.
२. मंदिरात गेल्यावर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
अ. आम्ही श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात पोचल्यावर ‘माझ्याकडे तारक रूपातील शक्ती येत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘श्री महालक्ष्मीदेवी मला तिचे तारक रूप अनुभवण्यास देत आहे’, असे मला वाटले.
आ. आम्ही दर्शन घेण्यासाठी देवीच्या समोर आल्यावर ‘देवीमधील तारक तत्त्व (देवीची कृपाळू आणि प्रेमळ दृष्टी) वाढले आहे’, असे मला जाणवले. देवीकडे पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
३. अनुभूती
३ अ. श्री महालक्ष्मीदेवीच्या जागी पांढरा प्रकाश दिसणे : श्री महालक्ष्मी देवीकडे पहातांना मला देवीची मूर्ती न दिसता तिथे पांढरा प्रकाश दिसत होता. तेव्हा ‘देवी मला प्रकाशरूपामध्ये दर्शन देत आहे’, असे मला जाणवले.
३ आ. देवीला नमस्कार करतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर पुजार्यांनी पेढा देणे, तेव्हा ‘देवीने प्रार्थना ऐकली’, असे वाटून भावजागृती होणे : देवीला नमस्कार करतांना मी प्रार्थना करत होते, ‘हे देवी, मला प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आनंद द्यायचा आहे. मला त्यांना अपेक्षित अशीच साधना करायची आहे.’ तेव्हा अकस्मात् तेथील पुजार्यांनी माझ्या हातात पेढा ठेवला. आधी मला वाटले, ‘ते मला देवीचे प्रसादरूपात फूल देत आहेत’; पण त्यांनी माझ्या हातात पेढा ठेवून माझ्याकडे बघून स्मितहास्य केले. तेव्हा मला वाटले, ‘देवीने माझी प्रार्थना ऐकून मला प्रसादरूपी पेढा भरवला.’ त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.
४. श्री महाक्ष्मीदेवीने सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !
४ अ. श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात अडकणे : मंदिराच्या बाहेर श्री महालक्ष्मीदेवीच्या विविध आकारातील मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. ‘त्यातील एक मूर्ती घ्यावी’, या विचाराने आम्ही मूर्ती बघत होतो; परंतु काही कारणाने आम्हाला देवीची मूर्ती घेता आली नाही. तेव्हा मला वाटले, ‘आता मला पुनःपुन्हा देवीचे दर्शन घेता येणार नाही.’ माझ्या मनात हा विचार आला, तेव्हा मला आतूनच शब्द ऐकू आले, ‘तू माझ्या रूपामध्ये अडकत आहेस. तू माझ्या रूपात अडकू नकोस.’
४ आ. श्री महालक्ष्मीदेवीने तिच्या रूपात न अडकता तत्त्वरूपाचे दर्शन घेण्यास सांगणे : देवी सूक्ष्मातून मला म्हणाली, ‘आज मी तुला माझ्या तत्त्वरूपाचे दर्शन दिले आहे. त्या तत्त्वरूपाची तुला सतत अनुभूती घेता येईल, तरीही तू माझ्या रूपात का अडकतेस ? तू घरी असतांना अधिकाधिक माझे तत्त्व अनुभवण्याचा प्रयत्न कर.’ तेव्हा ‘मी देवीच्या रूपात अडकत होते’, याची मला जाणीव झाली.
श्री महालक्ष्मीदेवीने मला हा विचार दिला आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेने मला तो ग्रहण करता आला. ‘हे गुरुदेव, तुम्हीच माझ्याकडून ही अनुभूती लिहून घेतली. तुमच्याच कृपेने मला श्री महालक्ष्मीदेवीचे तारक रूप आणि तिचे तत्त्व अनुभता आले’, त्याबद्दल आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १२ वर्षे), फोंडा, गोवा. (२५.३.२०२३)
|