तिरुप्पुर (तमिळनाडू) येथे ‘हिंदू मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

(टीप : ‘हिंदू मक्कल कत्छी’ म्हणजे हिंदु जनता पक्ष)

ग्रंथाचे प्रकाशन करतांना १ श्री. अर्जुन संपथ आणि २ श्री. रमेश शिंदे

तिरुप्पुर (तमिळनाडू) – हिंदु जनजागृती समितीनिर्मित ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या ग्रंथाचे प्रकाशन ‘हिंदू मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम हिंदू मक्कल कत्छी पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते. हिंदु मक्कल कत्छीचे तिरुप्पुर जिल्ह्याचे सचिव श्री. मणीगंदन यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाप्रमुख श्री. भूपती, जिल्हा सचिव श्री. मूर्ती, भाजपच्या ‘आयटी’ शाखेचे श्री. नवनिथन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

या वेळी श्री. शिंदे यांनी ‘हलाल’ आणि ‘हलाल अर्थव्यवस्था’ यांचा अंतर्गत हेतू, त्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका आणि त्यावर उपाय यांविषयी थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. बालाजी कोल्ला यांनी केले. या कार्यक्रमाला हिंदु मक्कल कत्छीचे अनेक कार्यकर्ते आणि हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण

‘दिनमलार’, ‘थंथी टीव्ही’, ‘न्यूज जे’, ‘न्यूज १८’, ‘मलाई मलार’ आदी प्रसारमाध्यमांनी कार्यक्रमाला ठळक प्रसिद्धी दिली. यासमवेतच ‘चाणक्य टिव्ही’ आणि ‘आय.एम्.के. टिव्ही’ या यू ट्यूब’ वाहिन्यांनीही प्रसिद्धी दिली.


श्री. अर्जुन संपथ म्हणाले, ‘‘श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल जिहाद’विषयी ग्रंथ लिहून समाजात जागृती करण्याचे असामान्य कार्य केले आहे.’’ या वेळी त्यांनी ‘सरकारने भारतात हलाल प्रमाणपत्र रहित करावे’, अशी मागणीही केली.