तुम्ही शिपाई होण्यासही पात्र नाही ! – उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी उपसंचालकांना फटकारले
उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे प्रकरण !
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपिठाचे न्यायमूर्ती रोहित आर्य यांनी खाण खात्याच्या उपसंचालकांना चांगलेच खडसावले. अवैध वाळू उत्खननाच्या खटल्याची सुनावणी करतांना न्यायमूर्तींनी उपसंचालकांना ‘तुम्ही शिपाई होण्यासही पात्र योग्य नाही. तुम्हाला अधिकारी कुणी केले ?’, असे सुनावले. भिंड जिल्ह्यातील वाळू उत्खननाच्या या प्रकरणात उच्च न्यायालयाने अनेक वर्षांपूर्वीच आदेश दिले आहेत. जिल्हाधिकार्यांनी गतवर्षी वाळूच्या वाहतुकीविषयी तसा आदेश काढला होता. असे असतांनाही खाण विभागाने वाळू वाहतुकीविषयी कोणताही आदेश काढला नाही. या प्रकरणाविषयी न्यायमूर्तीनी उपसंचालकांना चांगलेच खडसावले.
अनेक आदेश देऊनही खाण खात्याने वाहतूक पास का दिले नाहीत ?, असा प्रश्न न्यायमूर्तींनी उपसंचालकांना विचारला. त्यावर ते काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. हे बघून न्यायमूर्ती संतप्त झाले. सरकारी विभाग वाळू माफियांशी संगनमत करत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, ‘‘तुमच्यासारखे अधिकारी लाच घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत. या कारणामुळे या प्रकरणात पास जारी करण्यात आला नाही.’’ न्यायमूर्ती एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘तुम्ही पास देऊ शकत नसाल, तर न्यायालयात तुमचे उत्तर नोंदवा’, असे त्यांनी उपसंचालकांना सांगितले. अधिकार्याला सल्ला देतांना ते म्हणाले की, तुमच्या सवयी सुधारा, अन्यथा तुम्हाला निलंबित होण्याबरोबरच नोकरीही गमवावी लागू शकते.
संपादकीय भूमिकान्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्या कायदाद्रोही अधिकार्यांना केवळ फटकारून न थांबता त्यांना शिक्षा सुनावणे सामान्य जनतेला अपेक्षित आहे ! |