मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

  • ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

  • उपोषणाचा १० वा दिवस !

ह.भ.प. भगवान महाराज कोकरे : उपोषणाचा १० वा दिवस !

चिपळूण (रत्नागिरी) – सरकारने लोटे येथील ‘श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळे’ला उर्वरित अनुदान द्यावे, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्‍न सोडवावा, या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत केली जात नाही, तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार आहे, असा निर्धार ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी व्यक्त केला. मागील १० दिवसांपासून ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचे आमरण उपोषण चालू आहे.

ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांच्या उपोषणाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही दुर्लक्ष केल्यामुळे महाराज १९ एप्रिल या दिवशी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोशाळेतील सहस्रो गोमाता सोडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार होते; मात्र खेड पोलिसांनी त्यांना कह्यात घेऊन हे आंदोलन रोखले.

ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना खेड येथील कळंबोली शासकीय रुग्णालयात भरती केले होते. तेथे उपचार करण्यास नकार देत ह.भ.प. भगवान महाराज कोकरे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे.