भक्तीसत्संगात १२ ज्योतिर्लिंगांची माहिती ऐकतांना साधिकेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याचे जाणवून ती दिवसभर भावावस्थेत असणे
१. भक्तीसत्संगात शिवाचे माहात्म्य सांगितले जात असतांना १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडणे
‘१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळेे १६.२.२०२३ या दिवशीच्या भक्तीसत्संगात शिवाचे माहात्म्य सांगत असतांना मला १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडले. भक्तीसत्संगात १२ ज्योतिर्लिंगांची माहिती ऐकतांना मला ‘मी प्रत्यक्ष तेथे गेले आहे’, असे जाणवत होते आणि माझी भावजागृती होत होती. संपूर्ण सत्संगात माझा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू होता.
२. बारा ज्योतिर्लिंगांचे वर्णन ऐकतांना पूर्वी घेतलेल्या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनांच्या आठवणी जागृत होणे
मी यापूर्वी १२ ज्योतिर्लिंगांना जाऊन आले आहे. त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्योतिर्लिंगांचे वर्णन करत असतांना मी त्या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला गेले असतांनाच्या काही आठवणी माझ्या मनात जागृत होत होत्या.
३. काशी विश्वेश्वराची माहिती ऐकतांना स्वतः काशी विश्वेश्वरावर अभिषेक करत असल्याचे दृश्य दिसून भाव जागृत होणे
आम्ही काशी विश्वेश्वरला गेलो होतो. देवाच्या कृपेने आम्हाला काशी विश्वेश्वरावर पाण्याचा अभिषेक करून पिंडीवरून हात फिरवायला मिळाला होता. भक्तीसत्संगात ‘मी काशी विश्वेश्वरावर अभिषेक करत आहे’, असे दृश्य दिसून माझा भाव जागृत झाला. तेव्हा मला पुष्कळ आनंद वाटत होता.
४. भक्तीसत्संगात ज्योतिर्लिंगांवर बिल्वपत्र आणि पुष्प वहाण्यास सांगितल्यावर सूक्ष्मातून कुलदैवत खारेश्वराचे पूजन करणे
खारेश्वर हे आमचे कुलदैवत आहे. ते पनवेल (महाराष्ट्र) जवळ आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ज्योतिर्लिंगांवर बिल्वपत्र आणि पुष्प वहाण्यास सांगत होत्या. तेव्हा मी सूक्ष्मातून आमचे कुलदैवत खारेश्वर याच्या गाभार्यात जाऊन त्याची भावपूर्ण पूजा करत त्याला बेल आणि पुष्प वहात होते.
५. भक्तीसत्संग ऐकतांना भावावस्थेत जाणे आणि दिवसभर त्याच अवस्थेत रहाणे
मी भक्तीसत्संगात संपूर्ण वेळ भावावस्थेत होते. माझा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप भक्तीसत्संगात अखंड चालू होता. भक्तीसत्संग संपला, तरी माझे डोळे उघडत नव्हते. नंतर संपूर्ण दिवसभर मी भावावस्थेत आणि आनंदात होते.
‘प.पू. डॉक्टर, मला तुमच्या कृपेमुळे भक्तीसत्संगात हे अनुभवता आले आणि तुम्हीच माझ्याकडून हे लिहून घेतलेत. ते तुमच्या चरणी अर्पण करून मी तुमच्या आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती शर्मिला पळणीटकर (वय ७० वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (१८.२.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |