गंगा नदी अखंड वहाण्यासाठी पर्यावरण रक्षणाचा संकल्प करा !
१. गंगा नदीवर धरणे उभारण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या ब्रिटिशांना थांबवण्यासाठी जनतेने केलेला संघर्ष !
वर्ष १९१२ मध्ये हरिद्वारमध्ये पक्की धरणे बांधण्याचे काम चालू करण्यात आले होते. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पाहून ब्रिटिशांना आश्वासन द्यावे लागले होते की, गंगेचा प्रवाह कुठेही अडवण्यात येणार नाही; मात्र १९१४ मध्ये पुन्हा गंगा नदीवर धरण बांधण्याचे प्रयत्न चालू झाले. याच्या विरोधात वर्ष १९१६ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन चालू झाले. डिसेंबर १९१६ मध्ये अनेक संस्थानिकांच्या समक्ष ब्रिटीश सरकारने ‘गंगेचा अखंड प्रवाह निरंतर राहू देण्याची आणि हिंदु समाजाच्या अनुमतीविना प्रवाहात कुठलेही परिवर्तन होणार नाही’, अशी हमी दिली. ब्रिटिशांची सत्ता असेपर्यंत पुन्हा गंगेवर बांध घालण्याचा विषय निघाला नाही; मात्र स्वातंत्र्यानंतर पुन्हा गंगेचा अखंड प्रवाह अडवण्याचे प्रयत्न झाले आणि लोकभावनांचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. गंगेचा अखंड नैसर्गिक प्रवाह जागोजागी अडवण्यात आला. गंगेच्या किनारी असलेल्या शहरांमधील कारखान्यांची घाण गंगेत सोडल्यामुळे पवित्र गंगा प्रदूषित होत गेली. एकीकडे आम्ही लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या शोधात आहोत, तर दुसरीकडे प्रकट गंगेचे अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
२. जलविद्युत् निर्मितीसाठी बांध उभारल्याने अनेक समस्या समोर येणे
बांध उभारणी करत असतांना जलविद्युत् निर्मितीचे कारण सांगितले जाते; परंतु या एका लाभापेक्षा तोटे अधिक आहेत. बांधामुळे नद्यांचे पाणी अडवले गेल्याने पुढे नदीचा प्रवाह न्यून होत जाऊन समस्या निर्माण होतात. राज्याराज्यांत नदीच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. नद्या जोडण्याचे प्रकल्प मागे पडून काही ठिकाणी पूर येतो, तर काही ठिकाणी पाण्याचा अभाव रहातो. नदीवर बांध नसल्यास जलवाहतुकीचा लाभ होईल आणि तो जलविद्युत् निर्मितीच्या लाभापेक्षा अधिक आहे.
२ अ. जलविद्युत् प्रकल्पांमुळे पर्यावरणाच्या संकटासह सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्परिणाम होणे : उत्तराखंड येथे उभारण्यात येणार्या जलविद्युत् प्रकल्पांमुळे पर्यावरणाच्या संकटासह सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्परिणामही झाले आहेत. मनेरी, टिहरी आणि कोटेश्वर धरणांमुळे गंगा नदी सरोवर अन् कालवे यांत बंदिस्त झाली आहे. गंगेच्या काठावर सतत होणार्या अंत्यसंस्कारांमुळे नदीच्या किनारी रहाणार्यांनाही शुद्ध गंगाजल मिळणे कठीण झाले आहे. यामुळे हाही मोठा प्रश्न उद़्भवतो की, गंगेचा अखंड प्रवाह थांबवून ती शुद्ध राखणे शक्य होईल का ?
३. सौरऊर्जा निर्मितीस भारतात १०० टक्के अनुकूलता आहे. यास प्राधान्य दिल्यास पर्यायी मार्गाने स्वस्त आणि विपुल वीज उपलब्ध होऊ शकेल.
४. गंगेचा प्रवाह अखंड वहाता ठेवल्यास आर्थिक लाभ तर होतीलच, तसेच गंगेचे पावित्र्य टिकून तिच्यामुळे राष्ट्रीय अस्मिता आणि एकात्मता दृढ होईल.
५. गंगा नदीच्या काठावरील तीर्थे ही राष्ट्राच्या एकात्मतेचे आधारस्तंभ !
हरिद्वार, प्रयाग आणि काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांची पवित्रता गंगेच्या प्रवाहामुळेच जागृत आहे. गंगेचा जलस्तर न्यून झाल्यास कोट्यवधी लोकांच्या भावना आणि श्रद्धा यांवर आघात केल्यासारखेच होईल. गंगा नदीत भरपूर पाणी असल्यानेच तिच्या किनार्यावर वसलेल्या तीर्थक्षेत्रांना महत्त्व आहे. ही तीर्थक्षेत्रे राष्ट्राच्या एकात्मतेचे सर्वांत मोठे आधारस्तंभ आहेत.
भारतीय संस्कृतीची प्राणरेखा गंगा गोमुखातून निघून गंगासागरापर्यंत अखंड वहाण्यासाठी आपण स्वतःही निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाचा संकल्प करावा लागेल.’
(साभार : मासिक ‘गणानाम् त्वां’, जुलै २०१४)