निवेदनातील मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच उपाययोजना काढणार ! – नीलेश बेलसरे, विभागीय निरीक्षक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अमरावती विभाग
‘सनातन प्रभात’च्या एस्.टी. बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयीच्या वृत्तमालिकेतून सुराज्य अभियाना’ने उभारलेली चळवळ !
|
अमरावती, १९ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानक स्वच्छता मोहीम चालू असूनही अमरावती बसस्थानकात अद्यापही अस्वच्छता, जळमटे, दुर्गंधी, बांधकामाची दुरवस्था यांसारख्या अनेक समस्या आहेत. याविषयीचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत याविषयी आगार व्यवस्थापक सुहास पांडे आणि विभागीय निरीक्षक नीलेश बेलसरे यांना निवेदन देऊन याविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी सुहास पांडे यांनी ‘बसस्थानकावर कर्मचार्यांची कमतरता असल्याने आणि नागरिक सहकार्य करत नसल्याने या व्यवस्था परिपूर्ण होऊ शकत नाहीत’, असे सांगून ‘तरीही आम्ही प्रयत्न करत राहू’, असे आश्वासन दिले. नंतर विभागीय निरीक्षक नीलेश बेलसरे यांनी महामंडळाने याविषयी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांची विस्तृत माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘अमरावती बसस्थानकाला ‘स्मार्ट बसस्थानक’ करण्यासाठी २० लाख रुपयांची मान्यता मिळालेली आहे. त्यामध्ये भिंती बांधणे आणि त्या ‘वॉटरप्रूफ’ करणे ही कामे जुलै मासापर्यंत पूर्ण होतील. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने बसस्थानक अजून परिपूर्ण नाही, हे ठाऊक आहे. तुमच्यासारखे लोक येऊन आम्हाला ही माहिती देऊन साहाय्य करत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. भिंतींवर थुंकणे, लघुशंका करणे, धूम्रपान करणे यांविषयी आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नसल्याने ही कारवाई करण्याविषयी मी महानगरपालिकेकडे मागणी करतो. तुम्हीही तशी मागणी करावी. निवेदनात तुम्ही केलेल्या मागण्या अगदी रास्त आहेत. मी स्वतः त्या पूर्ण करण्याविषयी महानगरपालिकेचे आयुक्त आणि पालकमंत्री यांना पत्र पाठवीन. काही स्वयंसेवी संघटनांना आवाहन करून बसस्थानक स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. ८ दिवसांनी निवेदनातील मागण्यांनुसार काही प्रमाणात पालट झाला का ?, याचा पाठपुरावा घेण्यासाठी तुम्ही मला निश्चित संपर्क करा.’’
बस आगारातील पाण्याच्या अपव्ययाविषयी कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यावर विभागीय आयुक्तांनी पावले उचलली !
समाजसेवी कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेल्यावर बस धुण्यासाठी ज्या टाकीत पाणी साठवले जाते, ती टाकी झाडांनी आच्छादलेली होती, तसेच त्या टाकीतूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. याविषयी विभागीय आयुक्तांसमवेत चर्चा केल्यानंतर त्यांनी तात्काळ आगार व्यवस्थापकांना भ्रमणभाष करून चौकशी केली. भर उन्हाळ्यात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसतांना महामंडळ एवढे पाणी कसे वाया घालवत आहे ?, याविषयी खडसावले आणि तात्काळ त्याची दुरुस्ती करण्याची सूचना दिली. सामाजिक कार्यकर्ते हा विषय घेऊन आल्याविषयी त्यांचे आभार व्यक्त केले.
निवेदन देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे, ‘हक्काचं घर’ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीता तिवारी, ‘समर्पिता ग्रुप’च्या श्रीमती अल्का सप्रे, ‘आसरा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सौ. निशी चौबे, शिवसेनेच्या शहरप्रमुख सौ. वृंदा मुक्तेवार, भाजपच्या सरचिटणीस सौ. रोशनी वाळके, ‘जीवन संघर्ष संस्थे’च्या अध्यक्षा बरखा बोज्जे, महिला आणि बालकल्याण संस्थेच्या जया बद्रे, शिवांश बहुउद्देशीय संस्थेच्या सौ. दीक्षा सोनटक्के, सौ. गीता बोज्जे आणि श्री. अनिल वाळके उपस्थित होते.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ #Exclusive : जळमटांनी माखलेले छत, प्रवेशद्वारावर कचरा आदी अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे अमरावती बसस्थानक !
https://sanatanprabhat.org/marathi/666784.html