छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्तांच्या पाठिंब्याने हप्ते वसुली ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप !
सरकारने याची शहानिशा करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !
छत्रपती संभाजीनगर – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले असून त्यात छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविषयी तक्रार केली आहे, तसेच शहर पोलीस कशा प्रकारे हप्ते वसूल करतात ? हेही नमूद केले आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचार्यापासून ते पोलीस निरीक्षकापर्यंत कशाप्रकारे हप्ते वसुली केली जाते ? हे सर्व पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या पाठिंब्याने चालू आहे, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 18, 2023
अंबादास दानवे म्हणाले की, शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू आहेत. पोलिसांकडून शहरात हप्ते वसुली मोठ्या प्रमाणावर चालू आहे. शहरात सर्वत्र गुटखाविक्री जोरात चालू आहे. कुणाला किती हप्ता मिळतो ?, तसेच कोणत्या-कोणत्या गोष्टींसाठी हप्ते चालू आहेत, याची संपूर्ण सूचीच माझ्याकडे आहे. शहरात गुटखा, मटका आणि अवैध लॉटरी चालू आहे, मुरूम तस्करी चालू आहे, लॉजवाल्यांकडून हप्ते घेतले जात आहेत. मद्य विक्रेत्यांकडून हप्ते घेण्यात येतात. जुगार अड्डे चालवण्यासाठी हप्ते दिले जातात. वाळू माफियांकडून आणि ‘गॅस रिफिलिंग’ यांसाठी हप्ते घेतले जात आहेत.
पोलीस अधिकारी विमानाने पैसे पोचवतात !
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, काही पोलीस अधिकारी ते स्वतः किती कडक वागतात ? असे दाखवतात; पण हे केवळ हप्ते वाढवून मिळवण्यासाठी केले जाते. वाळूज आणि वाळूज औद्योगिक भागात अशा प्रकारे अवैध धंदे जोरात चालू आहेत. आधीचा पोलीस अधिकारी जाऊन त्याच्या जागी नवीन पोलीस अधिकारी आला की, लगेच हप्ते वाढवून घेतले जातात. शहरात पोलिसांकडून सध्या कोट्यवधी रुपयांची हप्ते वसुली चालू आहे. याच तक्रारीत एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याचा उल्लेख केला असून हे अधिकारी महोदय विमानाने प्रवास करतात आणि पैसे पोचवतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांना भ्रमणभाष क्रमांक देण्यास पोलिसांची टाळाटाळ !याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची याविषयी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला; मात्र गुप्ता यांच्या कार्यालयातील पोलीस निरीक्षक मासाळ यांनी गुप्ता यांचा भ्रमणभाष क्रमांक दिला नाही, तसेच अन्य पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक देऊन तेथून गुप्ता यांचा भ्रमणभाष क्रमांक घेण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या दूरभाष क्रमांकावर संपर्क साधला असता तेथील पोलिसांनीही गुप्ता यांचा भ्रमणभाष क्रमांक देण्यास नकार दिला, तसेच पुन्हा भ्रमणभाष केल्यावर त्यांनी दूरभाष उचललाच नाही. (पत्रकाराशी असे वागणारे पोलीस सामान्यांशी कसे वागत असतील ? याचा विचारच न केलेला बरा ! पोलीस आयुक्तांचा दूरभाष क्रमांक न देऊन पोलीस स्वत:ची नाचक्की करवून घेत आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ? – संपादक) |