नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमांची जाणवलेली विदारक स्थिती अन् त्याचा स्पर्धकांवर होणारा परिणाम आणि त्यासाठी असलेली साधनेची आवश्यकता !
सर्व विद्या आणि कला या ईश्वरनिर्मित असून त्या ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहेत !
‘भारतीय संगीत’ ही ईश्वराने मानवाला दिलेली एक ‘दैवी देणगी’ आहे. कलेचा मूळ उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे. स्वतःचा अहंकार त्यागून अखंड ईश्वराच्या अनुसंधानात राहून कलेतून अखंड ईश्वराची अनुभूती घेता येणे, म्हणजेच ‘कलेतून ईश्वरप्राप्ती साधणे’, असे म्हणता येईल. सध्याच्या गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या स्थितीचा अभ्यास केल्यास आताच्या नवोदित कलाकारांची कलेतून भौतिक सुख मिळवणे, विविध स्पर्धांत सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवणे, स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व निर्माण करणे अन् इतरांच्या समवेत स्पर्धा करणे, अशीच मानसिकता दिसते. याला एक कारण म्हणजे विविध कार्यक्रमांची (रिअॅलिटी शोज्ची) आलेली लाट होय.
१३.४.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण या स्पर्धा कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या होणार्या विक्षिप्त कृतींची काही उदाहरणे, काही परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलेला दिलेला अयोग्य प्रतिसाद, स्पर्धकांचे केलेले अवास्तव कौतुक, परीक्षक आणि पालक यांची स्पर्धात्मक मानसिकता आणि त्यातून परीक्षकांची दिसणारी विदारक स्थिती पाहिली. या लेखात रंगमंचावरील रचना आणि वातावरण, त्याचे नवोदित युवा पिढीवर जाणवलेले दुष्परिणाम आणि ते दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे, तसेच हा लेख लिहितांना साधिकेला आलेल्या अनुभूती या लेखात पाहूया.
५. या कार्यक्रमाच्या संदर्भात जाणवलेली इतर सूत्रे
५ अ. नृत्य करतांनाचा शृंगार, नेपथ्य आणि रंगमंचावरील रचना, तसेच वातावरण (थीम, सेटअप) भडकपणे बनवणे : ‘अनेकदा नृत्यासाठी रंगमंचावरील रचना, तसेच वातावरण (थीम, सेटअप) यांना भयावह परिणाम (Horror effect) दिला जातो. स्पर्धक कलाकारांचा शृंगार (मेकअप) बीभत्स केला जातो. ‘भूताचा चेहरा, हाडे-सांगाडे’ अशी रंगमंचाची रचना (थीम) केली जाते. रंगमंचावर मध्ये मध्ये धूरही (Smoke) सोडले जातात.
(‘शब्द, स्पर्श, रूप, रस अन् गंध या सिद्धांतानुसार जसा वेश असेल, तसे विचार आणि त्याच्याशी संबंधित स्पंदने तेथे निर्माण होतात.’ भूत, सांगाडा अशी मागे रचना असेल, तर रंगमंचावर तशीच नकारात्मक स्पंदने आकर्षित होतील अन् त्याचा प्रेक्षकांवरही तसाच विपरीत परिणाम होईल.’ – संकलक)
५ आ. रंगमंचावर आवश्यकतेपेक्षा अधिक प्रकाशयोजना (लाईट्स) असल्याने चेहर्यावरील भाव लक्षात न येणे : ‘कार्यक्रमात आवश्यकतेपेक्षा अधिक प्रकाशयोजनेचा (लाईटस्चा) वापर होतो’, असे मला जाणवले. त्यामुळे काही वेळा कलाकाराच्या चेहर्यावरील भाव, त्या नृत्यातील पदन्यास आदी कळत नाही. रंगमंचावर पार्श्वभागात पाच ते सहा पडदे (स्क्रीन्स, ‘दृश्ये दाखवण्यासाठी लावलेले विविध पडदे’) जोडलेले असतात. त्यावर नृत्य किंवा गाणे यांना अनुसरून चित्र अथवा ‘व्हिडिओ’ चालू असतो. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष कलाकारापेक्षा मागील पडद्यांकडे (स्क्रीन्सकडे) अधिक जाते. एका वेळी चार ते पाच बाजूंनी कॅमेर्यांंनी ‘फोकस’ घेतले जातात. त्यामुळे नृत्य सलग न बघता दृश्यातील चंचलता वाढते. प्रकाश चालू-बंद केल्याने एकप्रकारे अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते.
५ इ. स्पर्धक आणि परीक्षक यांनी तोकडे अन् भडक कपडे परिधान करणे : अनेक स्पर्धक आणि परीक्षक तोकडे, पारदर्शक आणि भडक कपडे घालतात, असेही पहाण्यात आले.
(‘येणारा नवोदित कलाकार समोरच्या परीक्षकांना आदर्श मानतो. त्या वेळी ‘समोरचे परीक्षक हे आपले गुरु आहेत’, असा त्यांचा भाव असतो. परीक्षकानेच वेशभूषा अशा प्रकारे परिधान केल्यावर येणार्या नवोदित स्पर्धकांसमोर त्याचा अयोग्य परिणाम होऊ शकतो.’ – संकलक)
५ ई. शृंगार, प्रकाशयोजना आणि वस्त्र यांवर अधिक व्यय केल्याने या कार्यक्रमातून लाखो रुपयांची उधळपट्टी होते.
६. या कार्यक्रमांमुळे नवोदित युवा पिढीवर जाणवलेले दुष्परिणाम
६ अ. वर्तमान युवा अभिनेता कलाकारांना आदर्श मानून त्यांचे अंधानुकरण करणे : आज अनेक तथाकथित सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेते यांचे युवा पिढी अनुकरण करते. त्यांना आदरस्थानी मानते अन् त्यांच्याप्रमाणे कृती करायला जाते.
(‘कलाकार धर्माचरण करत नसल्याने नवोदित कलाकाराने योग्य व्यक्तींचा आदर्श ठेवल्यास त्या कलाकाराला लाभ होईल.’ – संकलक)
६ आ. स्पर्धात्मक कार्यक्रमांतून ‘स्पर्धकाचा केवळ सर्वश्रेष्ठ कलाकार व्हायला पाहिजे’, अशी अहंयुक्त आणि संकुचित मानसिकता निर्माण होणे : समाज अशा प्रकारच्या गायन कार्यक्रमांकडे एक स्पर्धा म्हणून बघतो. स्पर्धकांचाही केवळ एवढाच विचार असतो, ‘मी पुढे गेलो पाहिजे. माझे गाणे चांगले झाले पाहिजे.’ त्यामुळे स्पर्धकाची वृत्ती संकुचित बनते.
६ इ. कलेचा मुख्य उद्देश ‘आनंदप्राप्ती’ असून तो अनुभवता न आल्याने स्पर्धक निराशेत जाणे : ‘कला आनंद देणारी आहे; पण कलाक्षेत्राला स्पर्धात्मक रूप आल्याने आणि त्याचे व्यावसायिकरण झाल्याने काही जण स्पर्धेमध्ये जिंकले नाही किंवा अपयशी झाले, तर ते निराशेतही जातात.
७. वरील प्रकारच्या कार्यक्रमामुळे नवोदित युवा पिढीवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे ?
७ अ. विद्यार्थीरूपी बिजाचे बाह्य आकर्षण पैसा आणि प्रसिद्धी यांपासून रक्षण करणे, हे शिक्षक, परीक्षक, तसेच पालक यांचे दायित्व असणे : पूर्वीच्या काळी जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत गुरु शिष्याला रंगमंचावर सादरीकरण करू देत नसत; कारण प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शिष्याचा सूक्ष्म अहं वाढू शकतो. एकदा ‘मला कळते’, अशी मानसिकता निर्माण झाली की, शिष्याची पुढचे शिकण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे त्याची प्रगतीही थांबते. शिष्याचे दायित्व हे गुरूंकडेच असते. ज्याप्रमाणे बीज लहान असतांना शेतकरी त्याचे ऊन, पाऊस आणि वारा यांपासून रक्षण करतो, त्याप्रमाणे विद्यार्थीरूपी बिजाला बाह्य आकर्षणे, पैसा आणि प्रसिद्धी यांपासून वाचवणे हे शिक्षक, परीक्षक अन् पालक यांचे दायित्व आहे.
७ आ. भारतीय कलांची मूळ पत टिकवून ठेवणे आणि तिच्यातील सात्त्विकतेचे संवर्धन करणे, हे आपले कर्तव्य असणे : भारतीय कलांची निर्मितीच ईश्वराकडून झाली असल्याने मुळातच भारतीय नृत्य आणि गायन हे प्रकार सत्त्वप्रधान आहेत. त्यांचे पाश्चात्त्य प्रकाराच्या समवेत अशास्त्रीयरित्या ‘फ्यूजन’ (भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत एकत्र करून बनवलेला संगीत किंवा नृत्य यांचा प्रकार) केल्यास नृत्य-गायनातील सात्त्विकता आणि पवित्रता नष्ट होईल; म्हणून भारतीय कलांची मूळ पत टिकवून ठेवणे आणि त्यांच्यातील सात्त्विकतेचे संवर्धन करणे, हे आपले कर्तव्य आहे.
७ इ. कलाकारांनो, कलेमध्ये ‘स्पर्धा’ किंवा ‘विजेता’ असे काही नसून शेवटपर्यंत शिकत रहाणे महत्त्वाचे असणे अन् त्यासाठी कला ही साधना म्हणून करणे आवश्यक असणे : नवोदित कलाकारांना योग्य दिशा नसल्याने अशा स्पर्धांमुळे ते अन्य कलाकारांशी स्पर्धा करू लागतात. त्याची परिणती द्वेष, असूया आणि मत्सर यांतही होऊ शकते. त्यामुळे असूया आणि मत्सर टाळून अन्य कलाकरांकडून शिकणे महत्त्वाचे आहे; कारण कलेमध्ये ‘स्पर्धा’ किंवा ‘विजेता’ असे काही नसून शेवटपर्यंत शिकत रहाणे महत्त्वाचेे आहे. सर्व विद्या आणि कला या ईश्वरनिर्मित असून त्या ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहेत. त्यासाठी कला ही साधना म्हणून करणे आवश्यक आहे.
७ ई. पैसा आणि प्रसिद्धी यांतून मिळणारे सुख हे अशाश्वत असून साधनेतून मिळणारा दैवी आनंद हा चिरंतन असणे : अशा कार्यक्रमांमुळे ईश्वरनिर्मित कलेला व्यावसायिकरण आल्याने दुःख अन् निराशा स्पर्धकांच्या पदरी पडते. कलेतून बाह्य रंजन करण्यापेक्षा ईश्वरासाठी रंजन केल्यास कलेतील खरा शाश्वत आनंद अनुभवता येईल, तसेच पैसा आणि प्रसिद्धी यांतून मिळणारे सुख हे अशाश्वत असून साधनेतून मिळणारा दैवी आनंद चिरंतन आहे. कलाकाराने कलेला ईश्वरप्राप्तीचे माध्यम म्हणून बघितल्यास कलेतून दैवी आनंद मिळेल. त्यामुळे कलाकारांनो, कलेतील सात्त्विकता टिकवून ठेवून कलेतील अपप्रकारांना आळा घालूया अन् कलासाधनेने मूळ कलेचे तिच्या शुद्ध स्वरूपात संवर्धन करूया.
८. लेख लिहिण्यापूर्वी आणि लिहितांना आलेल्या अनुभूती
अ. हा लेख लिहिण्यापूर्वी सूत्रे आपोआप सुचत गेली. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्याने मला मराठी वाक्यरचना करायला वेळ द्यायला लागतो; मात्र या लेखासाठी वाक्यरचना आणि सूत्रे पटकन सुचत गेली. मला एवढे सुचणे शक्य नाही. यावरून ‘देवच सुचवत आहे’, हे माझ्या लक्षात आले. यापूर्वी मी अशा प्रकारचे लिखाण कधीही केले नाही.
आ. एका मागून एक सूत्रे सुचण्याची गती एवढी होती की, त्या रात्री मला झोपही लागत नव्हती. त्यामुळे मी ती सूत्रे संक्षिप्त रूपात लिहून ठेवली. त्यानंतर मला शांत झोप लागली.
इ. दुसर्या दिवशी ही सूत्रे टंकलेखन करत असतांना माझे शरीर आतून उष्ण झाले होते. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझ्या बाजूलाच बसले आहेत आणि ते माझे लिखाण वाचत आहेत’, असे मला वाटत होते.
प्रारंभी मलाही योग्य दिशा ठाऊक नव्हती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ याविषयी दिशा दिल्याने कलेतील आनंद अनुभवता येत आहे. ‘आम्हाला सगळ्यांना यातून ईश्वराकडे जाण्याची बुद्धी होवो’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. ही सर्व सूत्रे सुचवल्याबद्दल गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.५.२०२१)