लोकांचे जीव धोक्यात असतांना राजकारण करू नका !

सुदान प्रकरणी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांना फटकारले !

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली  – सुदानमधील भारतियांचा जीव धोक्यात आहे. अशा परिस्थितीत राजकारण करू नका. सुदानमधील परिस्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. तिथे अडकलेल्या भारतियांना देशात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असे ट्वीट करून परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते सिद्धरामय्या यांना फटकारले. सुदानमधील गृहयुद्धात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे आणि ६० हून अधिक जण अडकले आहेत. यामध्ये कर्नाटकमधील ३१ भारतीय आदिवासी नागरिकांचा समावेश आहे. ‘या नागरिकांकडे पुरेसे अन्न आणि पाणीही नाही. केंद्र सरकारने त्यांना परत आणण्यासाठी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. भाजप सरकारने त्वरित सुदान सरकारशी चर्चा करून त्यांना परत मायदेशी आणावे’, असे ट्वीट  सिद्धरामय्या यांनी केले होते.
सुदानमधील पार्श्‍वभूमीवर तेथील भारतीय दूतावासाने तेथील भारतियांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नागरिकांनी घरातच रहावे, विनाकारण बाहेर पडू नये आणि दूतावासाकडून मिळणार्‍या माहितीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे भारतीय नागरिक सुदानला जाण्याचा विचार करत आहेत, त्यांनी त्यांचे नियोजन पुढे ढकलावे, असे आवाहन केले आहे.

 

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सुदानच्या प्रकरणी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहान आणि संयुक्त अरब अमिरातचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद अल नाहयान यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली.  याची माहिती जयशंकर यांनी ट्वीट करून दिली.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेस म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष !