सिंधुदुर्ग : कालावल खाडीपात्रात वाळूच्या अवैध उत्खननाच्या ठिकाणी बंदर विभागाची धाड
संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणार
मालवण – तालुक्यातील कालावल खाडीपात्रातील अधिकृत वाळू उत्खनन क्षेत्राच्या बाहेर अवैधपणे दिवसरात्र वाळूचे उत्खनन केले जात आहे. यामुळे खाडीचे पात्र विस्तारत असून येथील झाडे आणि वस्ती यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याविषयी मिळालेल्या तक्रारीनंतर मालवण बंदर विभागाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांसह १८ एप्रिल या दिवशी कालावल खाडीपात्रात धाड टाकली. या वेळी सापडलेल्या होड्यांवर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, असे मालवण बंदर विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
कालावल खाडी पात्रातील ‘सी-१ वाळू उत्खनन क्षेत्रा’त १८ होड्यांना वाळू उत्खननासाठी अनुमती आहे, असे असतांना अतिरिक्त ज्या ८ होड्या सापडल्या आहेत, त्या अनुमतीधारक आहेत का ? याची माहिती घेतली जाईल, तसेच त्यांची कागदपत्रे तपासली जातील. होड्यांच्या मालकांचे जबाब नोंदवून घेतले जातील. त्यानंतर नियमबाह्य वाळू उत्खनन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच ही कारवाईची मोहीम चालूच राहील, असे मालवण साहाय्यक बंदर निरीक्षक सुहास गुरव आणि अरविंद गुरव यांनी सांगितले.
येथील खोतजुवा बेटापासून दोन्ही बाजूला १ किलोमीटर क्षेत्रात वाळू उत्खननास अनुमती देऊ नये, तसेच रात्री अवैधपणे करण्यात येणारे वाळू उत्खनन थांबवावे. होड्यांची तपासणी करून ज्या होड्या अनधिकृत असतील, त्यांवर कारवाई करावी. येथील बेटे आणि पांडवकालीन बंधारा यांचे संरक्षण व्हावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी या वेळी केल्या.