प्रतिदिन ४-५ घंटे पाणी देऊ शकत नसल्यास आम्ही प्रशासन चालवण्यास अपयशी ! – मंत्री नीलेश काब्राल, गोवा

मंत्री नीलेश काब्राल

पणजी, १८ एप्रिल (वार्ता.) – आम्ही राजकारणी जर नागरिकांना प्रतिदिन ४-५ घंटे पाणी देऊ शकत नसू आणि त्याहून पुढे जाऊन २४ घंटे पाणी देण्याचे आश्वासन आम्ही नागरिकांना देत असू, तर आम्ही राजकारणी प्रशासन चालवण्यास अपयशी ठरलो, असे म्हणावे लागेल, असे विधान सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी केले. पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी बोलतांना मंत्री काब्राल यांनी हे विधान केले. मंत्री नीलेश काब्राल यांनी मागील मार्च मासाच्या अखेर १५ एप्रिलनंतर गोमंतकियांना प्रतिदिन ४ घंटे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले हाते. या आश्वासनाविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री काब्राल उत्तर देत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात सरकार प्रतिदिन ४-५ घंटे पाणी देण्याचे उद्दिष्ट पुढील काही दिवसांत पूर्ण करू शकणार आहे; मात्र यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.’’