कर्नाटकमध्ये ‘अधिवक्ता संरक्षण कायदा’ त्वरित लागू करा ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्च न्यायालय
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदूंच्या बाजूने लढणार्या अधिवक्त्यांवर झालेल्या गोळीबारामागे सूत्रधार कोण ?’, यावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
बेंगळुरू (कर्नाटक) – अधिवक्ता कृष्णमूर्ती हे विश्व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते आहेत. ते कर्नाटकमधील गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य अधिवक्ता आहेत, तसेच ते हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ यांना नैतिक, धार्मिक आणि कायदेशीर दृष्ट्या पाठिंबा देतात. यामुळेच त्यांना लक्ष्य केले गेले. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांची हत्या करण्याचे हे षड्यंत्र आहे. हिंदुत्वासाठी लढणार्यांना आज कुठलेच संरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सर्व अधिवक्त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी कायदा करण्याची मागणी आम्ही गेल्या ५ वर्षांपासून करत आहोत. त्यामुळे कर्नाटक सरकारने ‘अधिवक्ता संरक्षण कायदा’ त्वरित लागू करावा, अशी मागणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी केली आहे. हिंदु जनजागृती समितीकडून ‘गौरी लंकेश खटल्यात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने लढणार्या अधिवक्त्यांवर झालेल्या गोळीबारामागे सूत्रधार कोण ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
कर्नाटकमध्ये गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, असे ‘उत्तरप्रदेश मॉडेल’ लागू करा ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
(उत्तरप्रदेश मॉडेल म्हणजे गुन्हेगारी व्यक्तीची सर्व मालमत्ता कह्यात घेणे, बँक खाती गोठवणे, अवैध मालमत्ता पाडणे आदी प्रकारे गुन्हेगारांवर वचक बसवणे)
कर्नाटकमध्ये सध्याच्या काळात ३५ हिंदु नेत्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. यामधील बहुतेक प्रकरणांमध्ये ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) आणि प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जहाल इस्लामी संघटनांचा हात असल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे. ‘हिंदुत्वासाठी कार्य कराल, तर असाच परिणाम होणार’, अशी दहशत हिंदुत्वनिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि अधिवक्ता यांच्यामध्ये निर्माण करण्याचा सुनियोजित डाव आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात मैसुरू जिल्ह्यामध्ये सुनियोजितपणे टोळीच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात आल्या, तरीही गुन्हेगारांवर आतंकवादी कारवायांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला नाही. या घटनांमागील मुख्य सूत्रधाराला वारंवार जामीन मिळाला आणि सरकारी अधिवक्त्यानेही जामिनास विरोध केला नाही. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रकरणी जलदगती न्यायालयाच्या माध्यमांतून ही प्रकरणे त्वरित मार्गी लावली जात नसल्याने गुन्हेगारांना कोणतीही भीती राहिलेली नाही. अधिवक्ता कृष्णमूर्तींसारख्या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण दिले पाहिजे. ‘गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल’, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेतृत्वाची आज कर्नाटकला आवश्यकता आहे. असे झाले, तरच कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठांची हत्या, न्यायाधिशांना धमक्या देणे, हिंदु सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक करणे, असे अपप्रकार बंद होतील. म्हणून कर्नाटकमध्ये ‘उत्तरप्रदेश मॉडेल’ लागू केले पाहिजे.
आज केवळ हिंदु अधिवक्त्यांना लक्ष्य केले जाते ! – अधिवक्त्या (सौ.) दिव्या बाळेहित्तल, कर्नाटक उच्च न्यायालय
सध्या केवळ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना लक्ष्य केले जात आहे. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार करणारा अनुभवी होता. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली होती; मात्र सुदैवाने ते वाचले. कर्नाटक पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतल्याचे म्हटले आहे; परंतु या प्रकरणी अजूनही कुणालाही अटक झालेली नाही.