दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या कार्याचा आधारस्तंभ असलेले कै. मोहन बेडेकर !
१. सौ. स्नेहल संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘८.४.२०२३ या दिवशी मी दुपारची विश्रांती घेऊन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेसाठी आले. तेव्हा माझे यजमान श्री. संतोष यांनी मला ‘बेडेकरकाका गेले’, असे सांगितले. तेव्हा माझ्या मनात काकांविषयीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करून त्यांना आदरांजली वहाते.
१ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीची सेवा करण्यासाठी स्वतःचे घर उपलब्ध करून देणे : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीची सेवा काकांच्या घरून चालू आहे. जेव्हा समाजात ‘सनातन’ म्हणजे नक्की काय आहे ?’, हे ठाऊक नव्हते, तेव्हापासून काकांनी स्वतःच्या रहात्या घराचा काही भाग ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयीन सेवेसाठी वापरायला दिला. मला त्यांच्याविषयी एवढेच ठाऊक होते. आम्ही पूर्णवेळ साधना करण्यासाठी सेवाकेंद्रात रहायला येण्यापूर्वी माझा काकांशी विशेष संपर्क नव्हता.
१ आ. उच्चपदस्थ अधिकारी असूनही सेवाकेंद्रातील लहानसहान सेवा करणे : वर्ष २००७ मध्ये आम्ही (मी, माझे यजमान श्री. संतोष आणि मुलगी कु. मृण्मयी) पूर्णवेळ साधना करण्यासाठी रत्नागिरी सेवाकेंद्रात रहायला आलो. तेव्हा माझी काकांशी खर्या अर्थाने ओळख झाली. मला काकांचा पुष्कळ आधार वाटायचा. खरेतर काका व्यावहारिक जीवनात उच्चपदस्थ अधिकारी होते; पण याविषयी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कधीच कुणाच्या लक्षात यायचे नाही. लहानसहान सेवा करतांना त्यांच्याकडे कधी साहाय्य मागितले, तरीही ते ती सेवा आनंदाने करायचे. आमच्या घरी आम्ही तिघे जणच असल्यामुळे मला अधिक जणांसाठी अन्नपदार्थ बनवण्याची सवय नव्हती. मी सेवाकेंद्रात प्रसाद बनवण्याची सेवा करतांना पदार्थ ढवळण्यासाठी काकांना हाक मारली, तर ते त्वरित येऊन मला साहाय्य करायचे. ते ‘सेवाकेंद्रातील केर काढणे, लादी पुसणे, फुले आणणे, पूजा करणे’, या सेवा आनंदाने करायचे. ते नोकरीनिमित्त अन्य गावी जायचे; पण घरी आल्यावर सेवेला अधिक वेळ द्यायचे.
१ इ. सेवाकेंद्रातील कार्यपद्धतींचे पालन करणे : ते सेवाकेंद्रातील कार्यपद्धतींचे आनंदाने पालन करायचे. सर्वांसाठी जो पदार्थ बनवला जायचा, तो ते आवडीने खायचे आणि पदार्थ बनवणार्याचे कौतुकही करायचे. त्यांना सेवाकेंद्रातील लहान मुलांचेही कौतुक वाटायचे.
१ ई. दैनिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा तळमळीने करणे : वर्ष २००८ मध्ये रत्नागिरी आवृत्तीचा संपादकीय विभाग देवद (पनवेल) येथे स्थलांतरित झाला. त्या वेळी आम्हीही देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेलो. तेव्हाही दैनिकाच्या सेवेनिमित्त आमचा काकांशी भ्रमणभाषवर संपर्क होत असे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘दैनिकाचा ‘बटर पेपर’ काढणे, वितरण सूची करणे, या सेवा करत असत. त्यांची परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ होती. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात काही त्रुटी राहिल्या असल्यास त्यांना ते लक्षात यायचे, उदा. पानावरील एखाद्या वृत्तातील ‘उर्वरित लिखाण (शेष क्रमांक) अन्य पानावर आहे’, असे लिहिले असल्यास; पण प्रत्यक्षात ते (त्या क्रमांकाचे) लिखाण त्या पानावर नसल्यास काका त्याविषयी आम्हाला कळवत असत. काका दैनिक ‘सनातन प्रभात’ बारकाईने वाचायचे आणि आमच्याकडून राहिलेली त्रुटी आम्हाला कळवून ती सुधारून घ्यायचे. जिल्ह्यातून काही अडचण आल्यास किंवा आम्हाला काही अडचण आल्यास आम्ही काकांना सांगितल्यावर ते पुढील सर्व बघायचे.’
२. श्री. संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. बेडेकरकाकांचे निधन झाल्याचे समजल्यावर मन अस्वस्थ होणे
‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सर्व पाने पाठवली की, माझे काकांशी भ्रमणभाषवर बोलणे व्हायचे. त्या वेळी वेळेच्या उपलब्धतेनुसार कधीतरी माझे काकांशी अनौपचारिक बोलणेही होत असे. दैनिकाविषयी काही अडचण आल्यास अनेक वेळा काकांशीच अनेक गोष्टी बोलल्या जायच्या. या पार्श्वभूमीवर ‘बेडेकरकाका आता नाहीत’, हे समजल्यावर मी अस्वस्थ झालो. ‘आपत्काळ कसा असणार ?’, हे अनेक वेळा सांगितले आहे; पण ‘त्याची झळ स्वतःलाच बसल्यानंतर काय होऊ शकते ?, हे मला अनुभवता आले. त्याच रात्री मी श्रीमती बेडेकरवहिनींशी बोललो. तेव्हा त्या मला माझ्यापेक्षा स्थिर वाटल्या. मला त्यांच्याशी अधिक बोलता आले नाही.
२ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा तळमळीने करणे आणि अडचणीच्या वेळी परिस्थिती स्वीकारणे
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा समयमर्यादेत करायची असते. काका ही सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करायचे. काही कारणास्तव आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’ची पाने पाठवायला उशीर झाल्यास त्यांचा दूरभाष येत असे. तेव्हा ते ‘पाने पाठवायला उशीर होणार आहे का ?’, असे विचारायचे. नंतर आम्हीच त्यांना उशीर होणार असल्यास कळवत असू. त्या वेळी ते ‘आम्हाला काही अडचण नाही’, असे सांगून परिस्थिती त्वरित स्वीकारायचे.
२ इ. पुढाकार घेऊन सेवा करणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई, वितरण, बातमी’, यांविषयी संपर्क करून काय करू शकतो ?’, याविषयी त्यांना विचारल्यावर ते स्वतःहून पुढाकार घेऊन जेवढे जमेल, तेवढे करायचे.
२ ई. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकातील चुका कळवून त्या सुधारून घेणे
काही वेळा आमच्याकडून घाईत पाने पाठवली जायची आणि एखाद्या पानाचे ‘कट’ (टीप) पाठवायचे रहायचे. तेव्हा काका तत्परतेने ते मागवून घ्यायचे. त्यांना दैनिकाची पाने पाठवल्यानंतर ‘एखाद्या आकाशओळीतील किंवा मथळ्यातील शब्द चुकला आहे’, असे त्यांच्या लक्षात आले, तर ते आम्हाला पुन्हा दूरभाष करून तेवढ्या शब्दांचा ‘कट’ मागवून घ्यायचे आणि आमच्याकडून झालेली चूक ते सुधारायचे.
टीप – एखादे छायाचित्र (इमेज) किंवा लिखाण अंकाच्या घडीवर आल्यास तो शब्द तुटतो. तेवढेच छायाचित्र (इमेज) किंवा लिखाण दुसरे दिल्यावर ते बटरपेपरवर चिकटवता येते आणि लिखाण योग्य प्रकारे छापता येते.
बेडेकरकाका दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या कार्याचे पहिल्या अंकापासून आधारस्तंभ होते आणि आमचेही आधार होते. ‘अलीकडच्या काळातील ‘त्यांचे प्रेमाने बोलणे, परिस्थिती स्वीकारणे’, या गोष्टी पाहिल्यास ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली आहे’, असेे मला जाणवले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.४.२०२३)
कै. मोहन बेडेकर यांच्या देहावसानाच्या वृत्तातील त्यांच्या छायाचित्रात चांगला पालट जाणवणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये अनेक साधकांच्या वाढदिवसानिमित्त किंवा अन्य वेळी त्यांच्याविषयी कौतुकास्पद लिखाण छापून येते; पण आमच्या मनात ‘काकांविषयी लिहून द्यायला हवे’, हा विचार कधीच आला नाही. ही आमची चूक आहे. याविषयी आम्हाला खंत वाटते. काका प्रसिद्धीपराङ्मुख होते. ते आम्हाला मोठ्या मनाने समजून घेतील; पण आम्ही मात्र काका हयात असतांना त्यांचे कौतुक करण्याची संधी गमावली, याचे आम्हाला वाईट वाटते.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्याविषयी कधी छापून आले नसल्यामुळे आमच्याकडे त्यांचे छायाचित्र नव्हते. त्यांचे देहावसान झाल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांचे छायाचित्र छापायचे असतांना ते दैनिक विभागात नसल्याचे लक्षात आले. त्यांचे छायाचित्र मागवले असता त्यांचे ‘पासपोर्ट’ आकारातील छायाचित्र मिळाले. हे छायाचित्र छापण्यापेक्षा आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्तातील त्यांचे छायाचित्र शोधण्याचा प्रयत्न केला. निवेदन देत असतांनाच्या वृत्ताच्या छायाचित्रात त्यांचे छायाचित्र होते; पण ते आता प्रसिद्ध करू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही त्यांच्या जुन्या छायाचित्रात सुधारणा करून ते छापले. ते छायाचित्र ‘सनातन प्रभात’च्या पानावर घेतले. तेव्हा त्यात मला चांगला पालट जाणवला.’