बेंगळुरूतील ‘रमजान फूड मेळा’ रहित करा ! – नागरिकांची मागणी

  • कबाब आणि बिर्याणी विकण्यासाठी थाटली जातात अवैध दुकाने

  • वाहतूक कोंडी आणि कचर्‍याचे ढीग यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त

‘रमजान फूड मेळा’ रहित करण्याची नागरिकांची मागणी

बेंगळुरू – येथील फ्रेजर उपनगरातील रहिवाशांनी बेंगळुरू महानगरपालिकेला पत्र लिहून प्रतिवर्ष रमजान मासात येथील मशीद मार्गावर भरवला जाणारा ‘रमजान फूड मेळा’ रहित करण्याची मागणी केली आहे. फ्रेजर उपनगरातील मशीद मार्गावर रमजानच्या काळात प्रतिदिन संध्याकाळी कबाब आणि बिर्याणी विकण्यासाठी अवैध दुकाने थाटली जातात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि कचर्‍याचे ढीग यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. (अवैध दुकाने थाटून वाहतूक कोंडी आणि कचर्‍याचे ढीग करणार्‍यांच्या विरोधात स्थानिक लोकांना प्रशासनाकडे धाव घ्यावी लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

१. ‘बाहेरच्या लोकांनी ‘आमच्या गल्लीत ‘रमजान फूड मेळा’च्या नावाखाली दुकाने  थाटली आहेत आणि बाहेरून लोक येथे खायला येतात. यामुळे आमच्या भागातील शांतता भंग पावली आहे. त्यामुळे ‘रमजान फूड मेळ्या’वर त्वरित बंदी घालावी’, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

२. यासह स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या दुकानांच्या उभारणीमुळे फार आवाज होतो आणि सर्वत्र वाहने उभी केली जात असल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर अन्न शिजवले जात असल्याने दुर्गंधी पसरते आणि स्वयंपाक करतांना निघणार्‍या धुरामुळे हवा प्रदूषित होते.

संपादकीय भूमिका

सर्वसामान्यांना त्रास होणार्‍या गोष्टींवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून त्यावर कारवाई का करत नाहीत ?