धर्माचरण करणारी आणि आश्रमात येण्याची ओढ असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली परभणी येथील कु. संस्कृती गणेश शेंदूरवाडकर (वय १४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. संस्कृती गणेश शेंदूरवाडकर ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१५ मध्ये ‘कु. संस्कृती शेंदूरवाडकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.२.२०२३) |
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. दळणवळण बंदीच्या काळात नवीन कामे शिकणे
‘मी एकदा संस्कृतीला म्हणाले, ‘‘तुला सर्व कामे यायला पाहिजेत.’’ कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात ती नवीन कामे शिकली. तिच्यात नवीन पदार्थ करून पहाण्याची आवडही निर्माण झाली.
२. ऐकण्याची वृत्ती
अ. एकदा आम्ही ‘सनातनच्या पंचांगा’चे वितरण करायला दुकानांत गेलो होतो. तेव्हा मी संस्कृतीला सांगितले, ‘‘आता पुढील दुकानात पंचांगाची माहिती तू सांग.’’ तेव्हा तिने तसा प्रयत्न केला. सर्व पंचांगांचे वितरण झाल्यानंतर तिला पुष्कळ आनंद मिळाला. नंतर तिने ८० पंचांगांचे वितरण करायला मला साहाय्य केले.
आ. ‘आपत्काळात कोणती पूर्वसिद्धता करायला हवी ?’, याविषयीची सूत्रे समजल्यावर संस्कृतीने ती सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. ती स्वतःहून भाजीपाला लावायला शिकली.
३. धर्माचरण
संस्कृती सात्त्विक पोशाख परिधान करते आणि कपाळावर कुंकू लावते. ती तिच्या मैत्रिणींनाही त्याविषयी सांगते.
४. विविध कलागुण अंगी असणे
अ. संस्कृतीला ‘भरतनाट्यम्’ या नृत्यकलेची आवड असून ती पाच वर्षे ‘भरतनाट्यम्’ शिकली आहे. ती भावपूर्ण रीतीने नृत्य करते.
आ. संस्कृती देवतांची चित्रे चांगल्या प्रकारे काढते. ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्रही भावपूर्णपणे काढते. हे चित्र काढतांना ती तल्लीन होऊन जाते.
५. साधकांविषयी आदर
संस्कृतीला साधकांप्रती पुष्कळ आदर आहे. साधक घरी आलेले असतांना ती प्रत्येक कृती भावपूर्ण रीतीने करण्याचा प्रयत्न करते. ती ‘साधकांना अडचण होणार नाही’, याची काळजी घेते.
६. साधनेची आवड
संस्कृती नामजप करते. स्वतःकडून झालेल्या चुका लिहिते आणि आत्मनिवेदनही करते. संस्कृती तिच्या वडिलांना नामजप करण्याची आठवण करून देते आणि ‘‘तुम्ही पूर्णवेळ साधना करा’’, असे त्यांना सांगते.
७. आश्रमात येण्याची ओढ
संस्कृतीचा सात्त्विक वस्तू घेण्याकडचा कल वाढला आहे. कुठलीही वस्तू खरेदी करतांना ‘मला आश्रमात रहायला जायचे आहे, तर मला हे चांगले दिसेल का ?’, असा ती विचार करते.
८. साधकांना साहाय्य करणे
संस्कृती ग्रंथप्रदर्शन सेवेमध्ये ‘ग्रंथांची मांडणी करणे, सेवा झाल्यानंतर ग्रंथ आणि उत्पादन साहित्य मोजणे’, यांसाठी साधकांना साहाय्य करते.
९. संस्कृतीमध्ये जाणवलेले पालट
अ. संस्कृतीतील प्रेमभावात वाढ झाली आहे. साधक घरी निवासाला आले की, ती स्वतःहून त्यांच्यासाठी एखादा पदार्थ करते.
आ. संस्कृतीचा ‘इतरांकडून अपेक्षा करणे’ हा स्वभावदोष थोडा न्यून झाला आहे. ती सर्वांशी जुळवून घेऊ लागली आहे.
१०. अनुभूती
संस्कृतीला परात्पर गुरु डॉ. आठवले स्वप्नात दिसणे : संस्कृतीचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले झाल्यावर तिला प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) स्वप्नात दिसतात आणि जाग आल्यावर गुरुपादुकांचे स्मरण होते.
११. स्वभावदोष
अव्यवस्थितपणा, आळशीपणा, तुलना करणे आणि इतरांचा विचार नसणे.
गुरुदेवांनी माझी साधना होण्यासाठी मला ही बालसाधिका दिली आहे. यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अश्विनी गणेश शेंदूरवाडकर (कु. संस्कृतीची आई), परभणी (१२.५.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |