रक्तक्षयाची कारणे आणि उपचार !
‘रक्तक्षय हा बहुतांश स्त्रिया आणि बालक यांच्यामध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. त्याला आधुनिक शास्त्रात ‘अॅनेमिया’, तर आयुर्वेदामध्ये ‘पांडुरोग’ असे म्हटले आहे. या आजारात रुग्णाची त्वचा ही निस्तेज दिसते. आपण हा विषय आधुनिक शास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार अशा दोन्ही पद्धतीने समजून घेणार आहोत.
१. रक्तक्षय होण्यामागील कारणे
अ. आयुर्वेदानुसार रक्तक्षयासाठी तीनही दोषांचा प्रकोप कारणीभूत असतो. अतीव्यायाम करणे, अतीप्रमाणात खारट पदार्थ खाणे, पावटा, उडीद आणि तीळ तेल हे पदार्थ अतीप्रमाणात खाणे, दिवसा झोप घेणे, मलमूत्र इत्यादी वेग आल्यास त्याच वेळी त्याचे विसर्जन न करणे म्हणजेच हे नैसर्गिक वेग अडवून ठेवणे, चिंता, भय, क्रोध, शोक अशा मानसिक कारणांचाही शरिरावर परिणाम होऊन पुढे रक्तक्षय उद़्भवूू शकतो.
आ. आपण मागच्या लेखांमध्ये धातूंविषयी माहिती पाहिली. त्यात आपण पाहिले की, रक्त धातू निर्मितीसाठी रक्ताग्नीची आवश्यकता असते. रक्ताग्नीची विकृती असेल, तर रक्त धातू नीट निर्माण होणार नाही आणि म्हणून रक्तक्षय घडून येतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर आहाराचे नीट पचन झाले नाही, तर पुढचे धातु योग्य प्रकारे निर्माण होणार नाहीत.
इ. आधुनिक शास्त्रानुसार लोहाची कमतरता असणे, ‘बी-१२’ आणि ‘ब’ वर्गातील इतर जीवनसत्त्वांची कमतरता असणे अन् शरिरातून रक्तस्राव होणे, ही रक्तक्षयाची कारणे आहेत.
२. शरिरामध्ये रक्तस्राव होण्याची विविध कारणे
अ. जंत असणे
आ. मूळव्याध
इ. स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास
ई. पोटात अल्सर आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार
उ. मूत्रपिंडाचे आजार
ऊ. क्षयरोगासारखे गंभीर आजार
शरिरामधून बरेच दिवस रक्त बाहेर पडत असल्याने कालांतराने रुग्णांना रक्तक्षयाची समस्या उद़्भवते.
३. रक्तक्षयाची शरिरामध्ये दिसणारी लक्षणे
अ. त्वचा निस्तेज दिसणे
आ. अशक्तपणा
इ. पोटर्यांमध्ये गोळे येणे
ई. थोड्याशा श्रमानेही थकवा येणे
उ. हृदयाची धडधड वाढणे
ऊ. कार्यक्षमता अल्प होऊन उत्साह अल्प होणे
वरील लक्षणे दिसल्यास रुग्णांनी वैद्यांकडून तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. बरेच जण स्वत:च्या मनाने घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात. जेव्हा शरिराला औषधांची आवश्यकता असते, तेव्हा औषध न घेतल्याने रक्तक्षयासारखे लक्षण पुढे गंभीर समस्या निर्माण करते. तेव्हा औषधे ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजेत. रक्तक्षयाचे नेमके कारण शोधून त्यानुसार उपचार करणे, हे वैद्यांनी तपासणी केल्यावरच समजू शकते. तेव्हा स्वत:च्या मनाने काहीतरी उपचार करण्यात वेळ घालवू नये. रुग्णाने स्वत:च्या स्तरावर आहारात पालट करायला हरकत नाही.
४. रक्तक्षयामध्ये उपयुक्त आहार
टीप : ज्यांना रक्तक्षय आहे, त्यांनी औषधांच्या जोडीला खालीलप्रमाणे आहार घ्यावा, तसेच कोणत्याही एकाच पदार्थाचा अतिरेक करू नये. उदा अनेक जण असे करतात की, एखाद्या पदार्थमध्ये लोह असल्यास, तो पदार्थ वारंवार किंवा अतीप्रमाणात सेवन करतात. असा अतिरेक करण्याऐवजी समतोल साधणे आवश्यक आहे. आपण घेतलेला आहार नीट पचणे आणि त्यातून पुढे उत्तम धातू निर्माण होणे, ही आपली ‘इम्युुनिटी’च (रोगप्रतिकारक शक्ती) असते.
(साभार : ‘पंचम वेद-आयुर्वेद’ यू ट्यूब वाहिनी)
अ. वरणभात खातांना लिंबू अवश्य पिळावे; कारण लिंबाखेरीज तांदळातील लोहाचे पचन होणार नाही.
आ. भाकरी आणि लोणी खावे.
इ. पालक, लालमाठ, चाकवत, मेथी अशा पालेभाज्या करतांना लोखंडाच्या कढईतच करा. भाजी शिजल्यावर ती दुसर्या भांड्यात काढून ठेवा; पण भाजी परततांना ती आवर्जून लोखंडाच्या कढईतच परतावी.
ई. आमटी करतांना त्यात निश्चित कढीपत्ता घाला. बरेच जण कढीपत्ता बाजूला काढून उरलेला पदार्थ खातात. त्यांनी असे न करता कढीपत्ता आवर्जून खायला हवा. कढीपत्त्याची चटणीही करून खाऊ शकतो.
उ. फळांमध्ये आवळा, डाळींब, द्राक्ष आणि चिक्कू यांचा समावेश करावा. अंजीर, स्ट्रॉबेरी आणि जर्दाळू या फळांमध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असल्याने तेही आवर्जून खावे.
ऊ. गाजर, मुळा आणि बीट यांची कोशिंबीर करतांना शेंगदाण्याचा कूट घालून किंवा लिंबू पिळूनच करावी.
ए. रक्तक्षय झालेल्या रुग्णाला अधूनमधून गुळ खोबर्याचे सारण, गूळ आणि खोबरे घालून केलेले उकडीचे मोदक, गव्हाची गूळ घालून केलेली खीर अन् पुरण यांचा चांगला लाभ होतो.
ऐ. पालक, टोमॅटो आणि गाजर यांचे सूप करून प्यावे. घरी केलेले सूप ताजे आणि गरम गरम प्यावे. ‘इन्स्टंट’ सूप आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ते आवर्जून टाळायला हवे.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (९.४.२०२३)
(साभार : ‘पंचम वेद-आयुर्वेद’ यू ट्यूब वाहिनी)