बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात करण्याच्या रशियाच्या निर्णयाचा ‘जी ७’ देशांकडून निषेध !
(जी ७ देश : कॅनडा, अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या ७ देशांच्या राजकीय समूहाला ग्रुप ऑफ सेव्हन’ अर्थात् ‘जी ७ देश’ म्हणतात.)
नागानो (जपान) – येथे ‘जी ७’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बेलारूसमध्ये रशियाकडून परमाणु शस्त्रास्त्रे तैनात करण्याच्या घोषणेचा निषेध करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. यावर ‘जी ७’ देशांचा समूह अशा प्रकारचे कोणतेही कृत्य सहन करणार नाही, असे त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे म्हणणे आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील यद्धाला एक वर्ष उलटले असून युक्रेनला सैनिकी साहाय्य करण्याच्या भूमिकेचा पुनरूच्चारही या बैठकीद्वारे करण्यात आला.
Russia’s threat to deploy nuclear weapons in Belarus ‘unacceptable’: G7 pic.twitter.com/YeoWTCL91M
— The News Now (@NewsNowJK) April 18, 2023
१. ९० च्या दशकानंतर प्रथमच रशिया त्याच्याकडील परमाणु शस्त्रास्त्रे अन्य देशांच्या भूमीवर तैनात करणार आहे.
२. काही दिवसांपूर्वी १८ देशांनी युक्रेनला साहाय्य करण्याचे घोषित केले होते. या देशांनी पुढील वर्षापर्यंत किमान १० लाख तोफगोळ्यांचा पुरवठा करण्याचे सांगितले आहे. यासंदर्भातील करारांवर स्वाक्षर्याही करण्यात आल्या आहेत.
काय म्हणाले होते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन ?अमेरिकेने युरोपमध्ये अनेक ठिकाणी परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. या तुलनेत रशियाने बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली, तर हे पाऊल परमाणुविषयीच्या कराराचे उल्लंघन ठरणार नाही. या शस्त्रास्त्रांचे नियंत्रण बेलारूसकडे देण्यात येणार नाही, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या वेळी पुतिन म्हणाले होते की, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अनेक दशकांपासून अमेरिका त्याच्या सहकारी देशांच्या भूमीवर धोरणात्मकदृष्ट्या शस्त्रास्त्रे तैनात करत आहे. |