अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या मनोरुग्णालय शिपायास २० वर्षांचा सश्रम कारावास
रत्नागिरी, १८ एप्रिल (वार्ता.) – येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असतांना अल्पवयीन मुलीवर प्रादेशिक मनोरुग्णालयात कार्यरत असलेला आरोपी (शिपाई) सचिन दिलीप माने (वय ३८ वर्षे) याने पीडिता अल्पवयीन आहे, हे ठाऊक असतांनाही पदाचा गैरवापर करून पीडितेशी बळजोरीने शरीरसंबंध ठेवले. या कारणास्तव आरोपी सचिन माने याला विशेष पॉक्सो न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि ३१ सहस्र ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जिल्हा बालकल्याण समिती, रत्नागिरी यांनी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांना पत्राद्वारे पीडितेचे लैंगिक शोषण झाल्याविषयी गुन्हा नोंद करण्याविषयी कळवले होते. त्यानुसार ३ मार्च २०२० या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता (सौ.) मेघना सुहास नलावडे यांनी १४ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२)(ब)- १० वर्षे सश्रम कारावास १० सहस्र रुपये दंड, पॉक्सो ॲक्ट कलम ४(२) नुसार २० वर्षे सश्रम कारावास १० सहस्र रुपये दंड, बाल न्याय अधिनियम कलम ७५ नुसार १ वर्षे शिक्षा, ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील तपासिक अंमलदार लक्ष्मी सूर्यवंशी यांनी या प्रकरणी अन्वेषण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. पैरवी अधिकारी म्हणून सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.