गोवा : मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनार्‍यांवर संगीत महोत्सव घेण्यास बंदी येणार

मोरजी ते मांद्रे ही समुद्रकिनारपट्टी कासव संवर्धन केंद्र म्हणून घोषित केल्यामुळे संगीत कार्यक्रमांवर बंदी

पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – मोरजी ते मांद्रे ही समुद्रकिनारपट्टी कासव संवर्धन केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे किनारपट्टीपासून ५०० मीटर अंतरावर संगीत वाजवण्यास पूर्णत: बंदी येणार आहे. या क्षेत्रात यापुढे संगीत महोत्सव आयोजित करण्यास मनाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली आहे.

महाधिवक्ता (ॲटर्नी जनरल) देविदास पांगम

ते पुढे म्हणाले,

‘‘मांद्रे येथील कासव संवर्धनाला अडथळा ठरणार्‍या ३२ आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहे. या आस्थापनांकडे अनुज्ञप्ती नव्हती, असे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला सर्वेक्षण केल्यानंतर आढळले होते. मंडळाने यासंबंधीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला सुपुर्द केला होता. यानंतर गोवा खंडपिठाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकार्‍यांनी ही कारवाई केली.’’

गोवा समुद्रकिनाऱ्यावर कासवांच्या घरट्यांचे संवर्धन; जागरूकता आणि संरक्षण
(चित्रावर क्लिक करा)

मोरजी किनारा हा ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित मानला जातो. सध्या किनार्‍यावर वाढलेल्या विविध गतीविधींमुळे कासव संवर्धन उपक्रम धोक्यात येण्याची भीती अनेक संस्थांनी व्यक्त केली आहे.